software engineer grows ganja at home
हैदराबाद : व्यसन कोणतेही असो, ते केवळ एका व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. व्यसनाचा भयंकर विळखा इतका घट्ट असतो की, त्याच्या पाशात अडकलेली व्यक्ती स्वत:चे भान विसरते आणि क्षणिक सुखाच्या नादात आयुष्यभराचे शिक्षण, कमाई, नाती आणि अस्तित्वही गमावून बसते. असंच काहीसे हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या बाबतीत झालं. त्याने आपल्या संपूर्ण महिन्याचा पगार त्यावरच उधळला. यानंतर या व्यसनातून मानसिक संतुलन गमावल्याने नोकरीही गमावली. गांजा विकत घ्यायला पैसे संपल्याने त्याने चक्क आपल्या राहत्या घरीच गांजाची शेती सुरू केली. हैदराबादच्या नाचाराम परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सी.एच. शशिधर हा हैदराबादमधील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. मात्र, काही महिन्यांतच त्याला गांजाचे व्यसन लागले. तो आपल्या पगारातील मोठा हिस्सा या व्यसनावर खर्च करू लागला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यसनामुळे कामावर लक्ष देणे कठीण झाल्याने शेवटी त्याने नोकरीही गमावली.
खिशात पैसे नसल्याने शशिधरने नाचाराममधील गांधी नगर येथील आपल्या घराच्या छतावर (टेरेसवर) गांजाची झाडे लावण्यास सुरुवात केली. याबद्दल गुप्त माहिती मिळताच, रंगारेड्डी सक्तवसुली पथकाचे सर्कल इन्स्पेक्टर बालराज यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गांजाची १७ झाडे जप्त केली आहेत.
"काही झाडांना फुले आली होती, तर काही झाडे ३ मीटरपर्यंत वाढली होती. यातून साधारण १० किलो गांजाचे उत्पादन झाले असते," अशी माहिती सर्कल इन्स्पेक्टर बालराज यांनी दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी घटकेसर उत्पादन शुल्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, याच पथकाने मेडीपल्ली परिसरातून दोन इंजिनिअरिंगच्या (BTech) विद्यार्थ्यांना गांजा विकताना रंगेहाथ पकडले. बांदी अरुण कुमार आणि बी. आशिष अशी या विद्यार्थ्यांची नावे असून त्यांच्याकडून ४८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हे दोघेही किरकोळ स्वरूपात गांजाचा पुरवठा करत होते.
मुशिराबाद परिसरात केलेल्या एका मोठ्या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने 'ओजी कुश' (OG Kush) नावाचा अत्यंत महागडा हायब्रीड गांजा जप्त केला आहे. हा गांजा बँकॉकवरून तस्करी करून आणला गेल्याचा संशय आहे. आरोपी राहुल सिंग (२९) याच्याकडून ३६ लाख रुपये किमतीचा १.३११ किलो 'ओजी कुश' गांजा जप्त करण्यात आला. दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीपासूनच हैदराबाद आणि आसपासच्या परिसरात गांजा आणि ड्रग्जविरोधात कडक मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत झालेल्या विविध कारवायांमध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, या गुन्ह्यांमध्ये तरुण विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे.