How to Become IAS Without UPSC: भारतातील लाखो तरुणांचं एकच स्वप्न असतं, एक दिवस प्रशासकीय सेवेत जाऊन देशासाठी काम करायचं. IAS होण्यासाठी बहुतेकांना वाटतं की यासाठी एकच मार्ग आहे UPSC Civil Services Examination. पण वास्तव वेगळं आहे. UPSC हा मुख्य आणि थेट मार्ग असला तरी, काही पर्यायी मार्गांमधूनही IAS कॅडरमध्ये पोहोचता येतं.
IAS, IPS सारख्या उच्च पदांसाठी UPSC हीच सर्वात प्रतिष्ठित आणि थेट निवड प्रक्रिया आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण निवड फारच कमी लोकांची होते. ही परीक्षा तीन टप्प्यांत होते. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. यात यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर त्यांना विविध राज्यांमध्ये प्रशासनाची जबाबदारी दिली जाते. म्हणूनच UPSC हा सर्वात सरळ मार्ग मानला जातो.
खूप कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे राज्य सेवेतूनही IAS बनता येतं. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात Maharashtra Public Service Commission (MPSC) द्वारे अधिकारी निवडले जातात. हे अधिकारी सुरुवातीला डिप्टी कलेक्टर, SDM सारख्या पदांवर काम करतात. या पदांवर काम करताना त्यांना प्रत्यक्ष प्रशासनाचा मोठा अनुभव मिळतो. आणि याच अनुभवाच्या आधारावर पुढे त्यांना IAS कॅडरमध्ये प्रमोशनची संधी मिळू शकते.
हा मार्ग अवघड आणि वेळखाऊ आहे. राज्य सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुमारे 10 ते 12 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरच IAS प्रमोशनसाठी पात्रता मिळते. मात्र, फक्त वर्षं पूर्ण झाली म्हणून प्रमोशन मिळतं असं नाही, त्यासाठी कामगिरीही अत्यंत महत्त्वाची असते.
राज्य सेवेतून IAS बनण्यासाठी अनेक गोष्टी तपासल्या जातात. अधिकाऱ्याची कामगिरी, त्याचे वार्षिक गोपनीय अहवाल (ACR), शिस्त आणि सेवा नियमांचे पालन, तसेच उपलब्ध रिक्त जागा या सर्वांचा सखोल आढावा घेतला जातो.
या प्रक्रियेत राज्य सरकारची शिफारस महत्त्वाची असते. अंतिम निर्णयासाठी एक समिती बसते, ज्यात वरिष्ठ IAS अधिकारी, मुख्य सचिव आणि UPSC चे प्रतिनिधी असतात. ही समिती अधिकाऱ्याचा संपूर्ण रेकॉर्ड तपासते आणि त्यानंतरच IAS कॅडरमध्ये समावेशाचा निर्णय घेतला जातो.
2018 पासून केंद्र सरकारने एक नवीन मार्ग सुरू केला तो म्हणजे लेटरल एंट्री. या माध्यमातून अनुभवी प्रोफेशनल्सना थेट प्रशासनात प्रवेश दिला जातो. उदाहरणार्थ, डिप्टी सेक्रेटरी किंवा जॉइंट सेक्रेटरी सारख्या पदांवर नियुक्ती केली जाते. यासाठी किमान पदवी आणि संबंधित क्षेत्रात सुमारे 15 वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. मात्र, या नियुक्त्या बहुतेक वेळा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मार्गाने तुम्ही प्रशासनात प्रवेश करू शकता, पण थेट “IAS अधिकारी” म्हणून नाही.
सरळ सांगायचं तर IAS बनण्यासाठी UPSC हा सर्वात थेट आणि खात्रीशीर मार्ग आहे. पण जर UPSC करण जमलं नाही, तर राज्य सेवेतून मेहनतीने किंवा लेटरल एंट्रीद्वारे प्रशासनात स्थान मिळवण्याचे पर्याय खुले आहेत. मात्र, या दोन्ही पर्यायांमध्ये वेळ, अनुभव आणि सातत्य असणं गरजेच आहे.