

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2026 च्या निकालात देशभरातून 958 उमेदवारांची विविध अखिल भारतीय व केंद्रीय सेवांसाठी निवड झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांनी यश मिळवले असले, तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत राज्यातील निवडीचा आकडा लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून येत आहे. कोव्हिडपूर्व काळात महाराष्ट्रातून शंभरच्या पुढे उमेदवार निवडले जात असताना, आता हा आकडा यंदा 60 च्या आसपास थांबल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षांपैकी एक असलेल्या या परीक्षेत महाराष्ट्राची उपस्थिती लक्षणीय असली तरी राज्याच्या लोकसंख्या, शैक्षणिक परंपरा आणि संसाधनांच्या तुलनेत अपेक्षित यश नाही. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड काहीशी चढ-उताराची असली, तरी एकूण प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
2024 मध्ये देशभरातून 1 हजार 9 उमेदवार निवडले गेले होते, त्यामध्ये महाराष्ट्रातील 90 हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले होते. त्या वर्षी पहिल्या 100 मध्ये सात उमेदवारांचा समावेश होता. 2024 च्या निकालात देशभरातील 1,016 यशस्वी उमेदवारांपैकी राज्यातील सुमारे 87 जणांची निवड झाली होती. त्यावेळी एकूण निकालात महाराष्ट्राचा वाटा जवळपास 8.6 टक्के होता. या पार्श्वभूमीवर यंदा निवडीचा आकडा 60 च्या आसपास आल्याने जाहीर झालेल्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्य प्रशासकीय करिअर संस्थेत गेली दोन दशके अध्यापन करणारे भूषण देशमुख यांच्या मते, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून यूपीएससीमध्ये शंभरच्या पुढे विद्यार्थी निवडले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात हा आकडा घटल्याचे दिसते. देशभरातील यूपीएससी निकालात उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांचे वर्चस्व सातत्याने दिसून येते.
महाराष्ट्र लोकसंख्या आणि शैक्षणिक संधींच्या बाबतीत मोठे राज्य असले, तरी त्या तुलनेत त्याचा वाटा मर्यादित आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांसाठी एसआयएसी, सारथी, महाज्योती, बार्टी आणि आरती अशा विविध संस्था कार्यरत आहेत; मात्र अनेकदा या संस्थांमधील कामात समन्वयाचा अभाव दिसून येतो. मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे ते म्हणाले.
देशातील एकूण निवडीत महाराष्ट्राचा वाटा अनेक वर्षे साधारण 9 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान राहिला आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. यावर्षीचे प्रमाण थोडे कमी असल्याने काळजी वाटते. मात्र, स्पर्धा परीक्षांचा आलेख हा शेअर बाजाराप्रमाणे कधी वर तर कधी खाली जात असतो. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती या परीक्षेत लक्षणीय आहे. मात्र, शहरांतील विद्यार्थ्यांचा ओढा कॉर्पोरेट क्षेत्र, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्राकडे अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील लक्ष्य ॲकॅडमीचे संचालक अजित पडवळ यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले पायाभूत वातावरण तयार करण्यासाठी जिल्हा स्तरावर अभ्यासिका, वाचनालये आणि मार्गदर्शन केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन, संदर्भग्रंथ आणि अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून दिल्यास राज्यातील अधिक विद्यार्थी केंद्रीय सेवांकडे वळू शकतात. याशिवाय विविध संस्थांच्या प्रयत्नांचे एकत्रीकरण करून ठोस धोरण राबविण्याचीही गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे वर्चस्व
तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार महाराष्ट्रातून निवड होणाऱ्या उमेदवारांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतून अधिक विद्यार्थी यूपीएससीमध्ये यशस्वी होत आहेत; तर कोकणातून तुलनेने कमी उमेदवार दिसून येतात.
टक्का घटण्याची कारणे ः
1. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा यूपीएससीमधील वाटा अपेक्षेपेक्षा कमी आहे. राज्यात स्पर्धा परीक्षांसाठी अनेक संस्था कार्यरत असल्या तरी त्यांच्या कामामध्ये समन्वयाचा अभाव आहे.
2. मागील अनेक वर्षांत यूपीएससीच्या एकूण निवडीत महाराष्ट्राचा वाटा साधारण 9 ते 10 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. यंदाचा आकडा कमी असल्याने त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
3. कोव्हिड काळातील शिक्षणातील व्यत्यय, ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम आणि शालेय स्तरावर स्पर्धात्मक परीक्षांचे वातावरण कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम झाला आहे.
दृष्टिक्षेपात निकाल
2025 चा निकाल : 6 मार्च 2026 रोजी जाहीर झालेल्या या निकालात देशातून 958 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 60 पेक्षा अधिक उमेदवारांचा समावेश
2024 चा निकाल : यावर्षी देशात 1,009 उमेदवार निवडले गेले. अर्चित डोंगरे यांनी देशात तिसरा क्रमांक मिळवल्यामुळे महाराष्ट्राची कामगिरी उजवी ठरली
2023 चा निकाल : सुरुवातीला जाहीर झालेल्या 1,016 उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील आकडा 100 च्या जवळ होता. नंतर ‘रिझर्व्ह लिस्ट’मधून उमेदवारांची शिफारस केल्याने एकूण आकडा वाढला.