File Photo.
राष्ट्रीय

crime news | कौर्याचा कडेलोट..! मुलाच्या हव्यासापोटी नराधम बापाने केली जुळ्या मुलींची निर्घृण हत्या

shocking crime news | मुलींना विहिरीत टाकण्यापूर्वी विष पाजल्याचाही संशय

पुढारी वृत्तसेवा

shocking crime news

करीमनगर: वंश चालवण्यासाठी 'मुलगाच' हवा, या मानसिकतेतून एका नराधम बापाने कौर्याच्या सर्व परिसीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या हातांनी बापाने लेकींच्या रक्षणाची शपथ घ्यायची, त्याच बापाने जुळ्या मुलींचा विहिरीत बुडवून जीव घेतला. बाप-लेकीच्या नात्यालाच धक्का देणाऱ्या या घटनेने संपूर्ण तेलंगणा राज्य सुन्न झाले आहे.

सहा वर्षांपूर्वी विवाह, दाम्पत्याला जुळ्या मुली

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कंचू श्रीशैलम हा करीमनगर ग्रामीण भागातील ज्युबिली नगरमध्ये राहतो. त्याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना गीतांशी आणि गीतानविका या चार वर्षांच्या जुळ्या मुली होत्या.

मुली झाल्यापासून पतीचा पत्नीशी वाद

पोलीस आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलींच्या जन्मापासूनच श्रीशैलम नाराज होता. त्याला मुलगा हवा होता, मात्र मुली झाल्यामुळे तो सतत पत्नीशी वाद घालत असे. यावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत.

शेतातील विहिरीत चिमुरड्या मुलींना फेकले

शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा वाद झाल्यानंतर, श्रीशैलमने दोन्ही मुलींना गावाच्या बाहेरील शेतात नेले. तिथे त्याने त्यांना जवळच्या विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर गीतांशीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला, मात्र सुरुवातीला गीतानविका बेपत्ता होती. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलीस आणि स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने तिचाही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले

या भयंकर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले. त्यांनी आरोपी श्रीशैलमला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे. मुलींना विहिरीत टाकण्यापूर्वी त्यांना काही विषारी पदार्थ दिला होता का, याचा तपासही पोलीस करत आहेत.

मुलींना विहिरीत टाकण्यापूर्वी विष पाजल्याचाही संशय

करीमनगर ग्रामीण सर्कलचे निरीक्षक ए. निरंजन रेड्डी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार ही हत्या कौटुंबिक वादातून आणि प्रामुख्याने मुलींच्या जन्मामुळे झालेल्या नाराजीतून झाली आहे. ते म्हणाले, "आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, ज्यामध्ये मुलींना विहिरीत टाकण्यापूर्वी त्यांना विष दिले होते का, याचाही समावेश आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT