प्रातिनिधिक छायाचित्र.  
राष्ट्रीय

El Nino Threat : दुष्काळाचा दाह! २०२७ मध्ये अन्नधान्याचे भाव वाढणार; जाणून घ्या 'एल निनो'च्या संकटाचा हळूहळू होणारा परिणाम

खतांसह शेतीसाठीच्या भांडवलात होणार वाढ, प्रमुख पीक उत्पादक क्षेत्रांतील कृषी उत्पादनांवर संकट

पुढारी वृत्तसेवा

El Nino Impact on global food prices 2027 : ‘एल निनो’मुळे हवामानात होणारे प्रतिकूल बदल, खते आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे २०२७ मध्ये जागतिक अन्नधान्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचे परिणाम येत्या काही महिन्यांत अधिक स्पष्टपणे दिसून येतील, मात्र अन्नधान्यावरील पूर्ण परिणाम जाणवण्यासाठी काही काळ लागेल, असा निष्कर्ष 'एस अँड पी ग्लोबल' (S&P Global) या आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आला आहे. अत्यंत तीव्र 'एल निनो'मुळे प्रमुख पीक उत्पादक क्षेत्रांतील कृषी उत्पादनांवर संकट येऊ शकते, असा इशाराही या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

शेतीवर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा फटका ग्राहकांना बसणार

रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, इंधनाचे (डिझेल) भडकलेले दर आणि खतांचा तुटवडा यामुळे जगभरातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव वाढले की त्याचा परिणाम तात्काळ बाजारात दिसतो, परंतु शेतीच्या बाबतीत तसे होत नाही. शेतकरी पिकाची पेरणी, खते आणि इंधनाचा खर्च पीक येण्याच्या कित्येक महिने आधी करतात. त्यामुळे सध्या शेतीवर होणाऱ्या या अतिरिक्त खर्चाचा प्रत्यक्ष फटका ग्राहक बाजारासह अन्नधान्याच्या किमतींवर २०२७ पर्यंत होईल.

'एल निनो' २०२६ च्या अखेरच्या टप्प्यात सर्वोच्च पातळीवर असेल

अतिशय तीव्र स्वरूपाचा 'एल निनो' २०२६ च्या अखेरच्या टप्प्यात सर्वोच्च पातळीवर असेल. यामुळे २०२७ मध्ये आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील प्रमुख शेतीप्रधान देशांमध्ये भीषण दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या संकटांची मालिका सुरू होऊ शकते. आधीच खतांच्या तुटवड्यामुळे ज्या भागातील जमिनीची उत्पादकता घटली आहे, तिथे या बदलांचा सर्वाधिक फटका बसेल, असा इशाराही रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रासमोर एकाच वेळी अनेक संकटे

शेती क्षेत्रासमोर केवळ एकच संकट नसून अनेक संकटे एकाच वेळी उभी ठाकली आहेत. नैसर्गिक वायू आणि डिझेलचे दर: खत निर्मितीसाठी नैसर्गिक वायू तर ट्रॅक्टर, सिंचन आणि वाहतुकीसाठी डिझेल अत्यंत आवश्यक असते. युरोप आणि मध्यपूर्वेतील युद्धांमुळे डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत.

अन्नधान्याऐवजी इंधन पिकांना पसंती

डिझेल महागल्याने बाजारात 'बायोफ्यूएल'ची (जैवइंधन) मागणी वाढली आहे. परिणामी, अनेक प्रदेशांत खाद्यान्नापेक्षा इंधनासाठी लागणाऱ्या पिकांना जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे अन्नधान्याची लागवड घटत आहे. केवळ रोजच्या खाद्यान्नाची पिकेच नाही, तर गरीब देशांतील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार असलेली 'कॅश पिके' (नगदी पिके) देखील एल निनोच्या तडाख्यात सापडतील, असेही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम!

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अन्नधान्याचा राखीव साठा ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत एकाच वेळी अनेक देशांमध्ये पिकांचे नुकसान झाले, तर अन्नधान्याच्या साठ्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देताना एल निनोमुळे "जागतिक अन्नसंकट अगदी अटळ आहे असे नाही; पण ते आता केवळ दूरवरचा धोका उरलेला नसून अगदी तोंडावर येऊन ठेपले असल्याचेही 'एस अँड पी ग्लोबल' (S&P Global) चा रिपोर्ट स्पष्ट करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT