Pratik Jain Political Strategist: पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या पथकाने कोलकात्यातील I-PAC या राजकीय सल्लागार संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं. विशेष बाब म्हणजे, छापेमारी सुरू झाल्यानंतर काही वेळातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी स्वतः I-PAC च्या कार्यालयात पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल करत तपास यंत्रणांच्या कारवाईवर टीका केली.
या सगळ्या घडामोडींमुळे एक नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलं ते म्हणजे प्रतीक जैन. प्रतीक जैन कोण आहेत, ज्यांच्यासाठी ममता बनर्जी केंद्र सरकारशी थेट भिडायला तयार झाल्या? जाणून घेऊया.
भारतीय राजकारणात अनेक चेहरे समोर असतात, पण खरी सूत्रं अनेकदा पडद्यामागून हलवली जातात. प्रतीक जैन हे अशाच ‘बॅकएंड’मध्ये काम करणाऱ्या प्रभावी रणनीतीकारांपैकी एक मानले जातात. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या ‘वॉर रूम’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचार रणनीतीत डेटा आणि विश्लेषणाच्या माध्यमातून काम करणाऱ्या टीममध्ये ते होते.
पुढे, 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रतीक जैन यांनी थेट तृणमूल काँग्रेस (TMC) साठी काम केलं. डिजिटल प्रचारापासून ते जमिनीवरचा प्रचार कसा असावा, याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी तृणमूल काँग्रेससाठी काम केल्याचं सांगितलं जातं.
ममता बनर्जी यांनी प्रतीक जैन यांचा सार्वजनिक उल्लेख करत तृणमूल काँग्रेसच्या आयटी आणि रणनीती विभागाचा प्रमुख म्हणून त्यांना संबोधलं आहे. लाँगटर्मचा विचार करुन काम करणं, आकडेवारीवर आधारित निर्णय घेणं आणि शांतपणे काम करणं, ही त्यांची खासीयत आहे.
प्रतीक जैन यांचा राजकीय प्रवास प्रशांत किशोर यांच्या टीममधून सुरू झाला. 2013 साली, जेव्हा भाजप नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणण्याच्या तयारीत होती, तेव्हा प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील मुख्य रणनीती टीममध्ये प्रतीक जैन सहभागी होते.
मूळचे झारखंडचे असलेले प्रतीक जैन यांनी 2008 मध्ये IIT मुंबई मध्ये प्रवेश घेतला. त्यांनी मेटलर्जिकल इंजिनिअरिंग आणि मटेरियल सायन्समध्ये बीटेक पदवी मिळवली. सुरुवातीला त्यांचा करिअरचा मार्ग राजकारण नव्हता. एका खासगी बँकेत ट्रेनी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 2012 पासून एका बहुराष्ट्रीय कंपनीत डेटा अॅनालिस्ट म्हणून काम केलं.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रतीक जैन यांनी I-PAC या संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील काळात I-PAC ही भारतातील प्रमुख राजकीय सल्लागार संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. जरी I-PAC चा चेहरा म्हणून प्रशांत किशोर लोकांना माहित असले, तरी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात आणि रणनीती आखण्यात प्रतीक जैन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
ED च्या छापेमारीनंतर प्रतीक जैन यांचं नाव अचानक राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं आहे. एका बाजूला तपास यंत्रणांची कारवाई, तर दुसऱ्या बाजूला ममता बनर्जी यांचा विरोध.. या संघर्षामुळे प्रतीक जैन हे नाव केवळ पडद्यामाग न राहता थेट राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
एकीकडे भाजपच्या ‘वॉर रूम’मधील रणनीतीकार, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा प्रमुख शिल्पकार... प्रतीक जैन यांचा हा प्रवास भारतीय राजकारणातील बदलत्या समीकरणांचं ताजं उदाहरण आहे.