

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर वेगळे झालेले शरद पवार व अजित पवार हे काका-पुतणे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने युती केल्यानंतर यासंदर्भातील चर्चांना उधाण आले होते. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केलेल्या सूचक विधानामुळे त्यात आणखी भर पडली आहे. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करताना निवडणुका झाल्यानंतर यासंदर्भात विचार करू, असे संकेत देतानाच एकत्र येण्याची शक्यताच त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.
राज्यातील काही महानगरपालिकांच्या निवडणुकांत शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र आल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक असे सूचक संकेत एका मराठी वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान दिले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यायचे की नाही, याचा विचार अजून मी केलेला नाही; पण साधारणत: दोन्ही पक्षांचे खालचे कार्यकर्ते यामुळे समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय जीवनात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, एवढेच मी सांगतो. यावरून काय ओळखायचे ते ओळखा, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले.
पुण्यात आधी दोन्ही राष्ट्रवादींची युतीची चर्चा फिस्कटली होती; पण नंतर पुन्हा चर्चा झाली व युतीची घोषणा झाली. या घडामोडींसंदर्भात विचारणा केली असता अजित पवार म्हणाले, आघाडी-युती करता तेव्हा दोन पावले पुढे-मागे सरकावे लागते. आधी अपयश आले; पण नंतर पुन्हा प्रयत्न केला तेव्हा थोडेफार यश आले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कारभारावरही निशाणा साधला. पुण्यात 10 वर्षांपूर्वी पिकअवरमध्ये ज्या ठिकाणी जायला 10 मिनिटे लागायची, तिथे आता दीड तास लागतो. या वाहतूक कोंडीत सामान्य माणसाच्या आयुष्यातील तीन-तीन तास जातात. अशाने पुणेकर त्रासून जाणार नाहीत का? नुसती कामे सुरू आहेत, असे सांगितले जात आहे; पण ही कामे होणार कधी, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षांत पुण्यात खड्डे बुजवण्यासाठी 1,150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुण्याच्या विकासकामांसाठी पाऊण लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी फक्त 650 कोटी रुपयेच खर्च करण्यात आले, 500 कोटी रुपयांचा निधी तसा पडून राहिला, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
महानगरपालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणीही मोठे नेते पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारात दिसत नसल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले होते. त्यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवार म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे जितेंद्र आव्हाडांचे काम ठाण्यात चालू आहे. अमोल कोल्हे, नीलेश लंके असे काही मान्यवर प्रचारासाठी येणार आहेत. सुप्रिया सुळेंनी त्यांच्याही कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, त्याही वेळ देणार आहेत.