

Luxury Hotel Leela Palace Udaipur fined Rs 10 lakh Consumer court orders
चेन्नई : हॉटेलमध्ये मुक्कासाला असलेल्या ग्राहकाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करणे हे व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत चेन्नई येथील ग्राहक मंचाने उदयपूरमधील प्रसिद्ध 'लीला पॅलेस' हॉटेलला मोठा झटका दिला आहे. हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याने 'मास्टर की'चा वापर करून महिला ग्राहकाच्या खोलीत अनधिकृत प्रवेश केल्यामुळे, हॉटेलला १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित महिला तक्रारदार या २६ जानेवारी २०२५ रोजी उदयपूर येथील 'लीला पॅलेस' हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या. त्या खोलीत असतानाच, हॉटेलच्या हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याने कोणत्याही परवानगी आणि पूर्वसूचनेशिवाय शिवाय 'मास्टर की' वापरून थेट खोलीत प्रवेश केला. हॉटेल कर्मचा-याच्या या कृतीमुळे आपल्या गोपनीयतेचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग झाल्याचा दावा करत महिलेने चेन्नई जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे धाव घेतली होती.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हॉटेल व्यवस्थापनाने असा युक्तिवाद केला की, अंतर्गत कार्यपद्धतीनुसार कर्मचा-याने खोलीत प्रवेश केला होता. मात्र, ग्राहक मंचाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. ‘केवळ हॉटेलच्या अंतर्गत नियमांचे कारण देऊन हाऊसकीपिंग कर्मचारी पाहुण्यांच्या खोलीत मास्टर की वापरून प्रवेश करू शकत नाहीत. असे करणे म्हणजे सेवेतील त्रुटी असून ग्राहकाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे गंभीर उल्लंघन आहे,’ असे निरीक्षण आयोगाने नोंदवले.
ग्राहक मंचाने हॉटेलला आदेश देत म्हटले की, पीडित महिलेला झालेल्या मानसिक आणि आर्थिक त्रासाबद्दल १० लाख रुपये भरपाई द्यावी. खोलीचे ५५,५०० रुपये हे संपूर्ण भाडे २६ जानेवारी २०२५ पासून ९ टक्के व्याजासह परत करावे. तक्रारदाराला खटल्याच्या खर्चापोटी १०,००० रुपये द्यावेत.
हा निकाल हॉटेल उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अनेकदा हॉटेल कर्मचारी साफसफाई किंवा देखभालीच्या नावाखाली ग्राहकांच्या खोलीत प्रवेश करून हस्तक्षेप करतात. मात्र, ग्राहकाच्या संमतीशिवाय असे करणे बेकायदेशीर ठरू शकते, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.