प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari photo
राष्ट्रीय

Divorce Alimony in India : सुमारे ४२ टक्के पुरुषांना पोटगीसाठी घ्यावे लागले कर्ज!

भारतातील घटस्फोटाचा महिला आणि पुरुषांवर होणाऱ्या परिणामावर नवीन सर्वेक्षण

पुढारी वृत्तसेवा

Divorce Alimony in India : लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी वधू आणि वर असंख्य स्वप्ने घेऊन नवजीवन सुरु करतात. आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात; पण सारेच जण संसाराच्या परीक्षेत उत्तीर्ण होत नाहीत. काहींचा डाव अर्ध्यावरच मोडतो. नात्यामध्ये कटुता इतकी वाढते की, याचा शेवट विवाह संपुष्टात आणण्यात होतो. घटस्फोटाचे दुष्परिणाम किती वेदनादायक असू शकतात, हे एका नव्या सर्वेक्षणातील आकडेवारीच सांगते.

४२ टक्के घटस्फोटीत पुरुषांना पोटगीसाठी काढावे लागते कर्ज

1 Finance Magazineने नुकतेच केलेल्‍या सर्वेक्षणात देशातील घटस्‍फोटानंतरच्‍या आर्थिक समस्‍येवर प्रकाशझोत टाकलेा आहे. या सर्वेक्षणाचा तपशील शेअर करताना, 1 Finance Magazine चे संस्थापक कानन बहल यांनी म्‍हटलं आहे की, देशात घटस्फोट घेतलेले सुमारे ४२ टक्के पुरुष हे घटस्फोटाच्या कार्यवाहीसाठी किंवा पोटगीसाठी कर्ज काढतात.

सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर

कानन बहल यांनी केलेल्‍या एक्‍स पोस्‍टनुसार, घटस्फोटाचा आर्थिक स्थितीवर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला १,२५८ लोकांचे सर्वेक्षण करण्यासाठी ६ महिने लागले. भारतात घटस्फोट घेतलेल्यांपैकी ६७% लोकांमध्ये आर्थिक बाबींवर वारंवार वाद होतात. ४२% पुरुषांनी घटस्फोटाच्या पोटगीसाठी कर्ज घेतले.घटस्फोटामुळे भारतात मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक खर्चावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. तथापि, त्याचे आर्थिक परिणाम खोलवर जातात, पण त्यावर फारशी चर्चा होत नाही. लग्नाचा खर्च वाया जातो, देखभाल, पोटगी, कायदेशीर खर्च, करिअरशी संबंधित अडथळे यांना सामोरे जावे लागते, असेही कानन बहल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

23 टक्के महिलांना अन्य शहरात करावे लागले स्थलांतर

कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारताना लग्नानंतर महिलांना कसा फटका बसतो, याचेही सर्वेक्षण झाले. यामध्ये २३ टक्के महिलांना अन्य शहरात स्थलांतर करावे लागले. यातील १६ टक्के महिलांची कामाची जबाबदारी कमी झाली, तर ३० टक्के महिलांनी नोकऱ्या सोडल्या. ४३ टक्के प्रकरणांमध्ये लग्नानंतर पतींनी खर्चाची संपूर्ण जबाबदारी घेतल्याचे निदर्शनास आले.

२६ टक्के महिलांना पतीच्या संपत्तीच्या १००% पेक्षा जास्त रक्कम पोटगी म्हणून मिळाली

सर्वेक्षणात असे आढळले की, पोटगीची रक्कम देण्यासाठी ४२ टक्के घटस्फोटीत पुरुषांनी कर्ज घेतले. २९% लोकांनी निव्वळ संपत्ती नकारात्मक असतानाही पोटगी दिली. २६% महिलांना त्यांच्या पतीच्या एकूण संपत्तीपेक्षा १००% अधिक रक्कम पोटगी म्हणून मिळाली. पोटगीसाठी पुरुषांच्या वार्षिक उत्पन्नाच्या ३८% रक्कम भरपाई म्हणून खर्च झाली.

आर्थिक समस्यांवरून वादावादी

घटस्फोटानंतर ६७% महिलांनी दर पंधरवड्यातून किमान एकदा आर्थिक बाबींवर वादविवाद केल्याचे सांगितले. ९०% महिलांनी महिन्यातून किमान एकदा आर्थिक बाबींवर वादविवाद केल्याचे नमूद केले.

घटस्फोटाची कारणे आणि खर्च

घटस्फोटासाठी १६% महिलांनी ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे सांगितले. ४९% पुरुषांना ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागली. घटस्फोटाच्या कारवाईत कायदेशीर शुल्क, वाहतूक, अंतरिम देखभाल आणि मानसिक आरोग्याचा खर्च समाविष्ट होता, मात्र पोटगी यात गृहित धरलेली नाही. ५६% महिलांनी सासरच्यांमधील वादाचा उल्लेख केला. ४३% महिलांनी आर्थिक समस्यांमुळे घटस्फोट घ्यावा लागल्याचे सांगितले.पुरुषांमध्ये घटस्फोटासाठी ४२% लोकांनी आर्थिक समस्यांचा, २१% लोकांनी विसंगतीचा, आणि उर्वरित २१% लोकांनी पत्नी प्रामाणिक नसल्याचे कारण दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT