पुढारी ऑनलाईन डेस्क : पतीकडून पोटगी म्हणून महिन्याला ६ लाख रुपयांची मागणी करणारे एक विचित्र प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल झाले. या प्रकरणाच्या सुनावणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यायमूर्तींनी महिलेच्या वकिलाला वाजवी पोटगीची मागणी करा अन्यथा याचिका फेटाळली जाईल, असेही फटकारले. जाणून घेवूया न्यायालयात नेमकं काय घडलं याविषयी....
राधा मुनकुंतला यांचा घटस्फोट झाला. ३० सप्टेंबर २०२३ रोजी कौटुंबिक न्यायालय, बंगळूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांनी पती एम नरसिंह यांना पोटगी म्हणून महिन्याला ५० हजार रुपय देण्याचे आदेश दिले. अंतरिम देखभाल रकमेत वाढ करण्याची विनंती करणारी याचिका राधा मुनकुंतला यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली होती, यावर २० ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणवर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिलेचे वकील तिच्या पतीकडून महिन्याला 6 लाख रुपये पाेटगी मिळावी यासाठी युक्तिवाद करत आहेत. वकील न्यायालयाला सांगतात की, "महिलेला शूज, कपडे, बांगड्या इत्यादींसाठी दरमहा १५ हजार रुपये खर्च येताे.तर घरातील जेवणासाठी दरमहा ६० हजार रुपये लागतात. गुडघेदुखीच्या उपचारासाठी आणि फिजिओथेरपी आणि इतर औषधांसाठी ४ ते ५ लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळे पाेटगी म्हणून महिन्याला ६ लाख रुपये देण्यात यावेत."
सुनावणीदरम्यान महिला न्यायमूर्ती म्हणाल्या की, "अशा प्रकारची मागणी करणे हेच न्यायालयीन प्रक्रियेचा शोषण आहे.जर तिला इतके पैसे खर्च करायचे असतील तर ती स्वत: कमवू शकते. कृपया कोर्टाला सांगू नका की हे सर्व एका व्यक्तीला हवे आहे. प्रति महिना ६ लाख १६ हजार ३०० रुपये इतका खर्च कोण करते ? जर तिला एवढे पैसे महिन्याला खर्च करायचे असतील तर तिला स्वत:लाच कमवू द्या. कारण संबंधित महिलेवर इतर कोणत्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या नाहीत. तुम्हाला मुलांची काळजी घेण्याची गरज नाही. तुम्हाला ते तुमच्यासाठी हवे आहे. तुम्ही संवेदनशील असले पाहिजे," असे स्पष्ट करत महिलेच्या वकिलाला वाजवी रकमेची मागणी करा अन्यथा याचिका फेटाळण्यात जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.