राष्ट्रीय

dating fraud case | 'डेटिंग'च्या जाळ्यात ५०० महिला अडकल्या! लग्नाचे आमिष दाखवून २ कोटींचा गंडा घालणारा महाठग जेरबंद

dating fraud case |एकाच वेळी अनेक नावांचा वापर, फसवणुकीतील पैसा उडवला ऑनलाइन गेमिंगवर

पुढारी वृत्तसेवा

dating fraud case

नवी दिल्ली : "चित्रपट असो वा नाटक... वेगवेगळ्या ओळखी सांगून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ठगांच्या गोष्टी तुम्ही आजवर पडद्यावर पाहिल्या असतील. अशीच फिल्मी स्टाईल फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका ठगाने तब्बल ५०० हून अधिक महिलांची सुमारे २ कोटी रुपयांची फसवणूक केली असून, दिल्ली सायबर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चार मोबाईल फोन, आठ सिमकार्ड, तीन डेबिट कार्ड आणि फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

आधी बोगस ओळख... भावनिक नाते आणि शेवटी फसवणूक

'मॅच, डेट, नाटक आणि फसवणूक' या चार शब्दांभोवती पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील रहिवासी आनंद कुमार याचे आयुष्य फिरत होते. कुमार डेटिंग आणि मॅट्रिमोनिअल (वैवाहिक) ॲप्सवर कधी डॉक्टर, कधी व्यावसायिक, चित्रपट निर्माता तर कधी वकील असल्याची खोटी ओळख सांगून महिलांशी संपर्क साधायचा. काही काळानंतर तो त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण करायचा आणि लग्नाचे आमिष दाखवायचा. काही प्रकरणांमध्ये त्याने मॉडेलिंगच्या संधी आणि नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासनही दिले होते.

लग्नाचे आमिष दाखवून लूट

डेटिंगच्या काळात कुमार ओळख झालेल्या महिलेबरोबर भावनिक नाते निर्माण झाल्याचे नाटक करायचा. यानंतर ओळख वाढवून लग्नाचे आमिषही दाखवायचा. याच काळात आपण खूपच दुःखी असल्याचे सांगायचा. मोठा आजार किंवा व्यवसायात झालेले नुकसान किंवा कौटुंबिक समस्या असल्याचे सांगायचा. महिलेची सहानुभूती मिळवून आर्थिक मदत मागायचा. एकदा का पैसे मिळाले की, तो गायब होत असे.

एका महिलेची पोलिसात तक्रार

एका पीडित महिलेने तक्रार दाखल केली. वैभव अरोरा नावाच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून एका व्यक्तीने आपली ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिने केला. या दोघांची ओळख एका डेटिंग ॲपवर झाली होती, त्यानंतर ते इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर बोलू लागले. अरोराने तिला लग्नाचे वचन दिले आणि नंतर विविध कारणांनी तिच्याकडून पैसे उकळले. जेव्हा पीडितेने पैसे परत मागितले, तेव्हा त्याने प्रतिसाद देणे बंद केले. "वैभव अरोरा" याचा मृत्यू झाला असल्याचा दावाही त्या इंस्टाग्राम अकाउंटवरून करण्यात आला.

तपासातून धक्कादायक वास्तव समोर

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक, सोशल मीडिया खाती आणि आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी केली. तपासात असे निष्पन्न झाले की, वैभव अरोरा बनून फसवणूक करणारा हा व्यक्ती प्रत्यक्षात पश्चिम बंगालचा रहिवासी आनंद कुमार आहे. सायबर पोलिसांनी बंगालमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून आरोपीला अटक केली.

एकाच वेळी अनेक नावांचा वापर

चौकशीत असे समोर आले की, कुमार एकाच वेळी अनेक नावांनी वावरत होता. त्याने डॉ. रोहित बहल, तरुण आणि आनंद शर्मा अशा वेगवेगळ्या नावांनी प्रोफाईल्स चालवले होते; अगदी 'शिखा' या नावानेही तो सक्रिय होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो अनेक मोबाईल फोन आणि विविध सिमकार्ड वापरत असे.

फसवणुकीतील पैसा उडवला ऑनलाइन गेमिंगवर

पोलिसांनी आरोपीकडून चार मोबाईल फोन, आठ सिमकार्ड, तीन डेबिट कार्ड आणि फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. तपासात असेही आढळले की, फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा मोठा हिस्सा त्याने ऑनलाइन गेमिंग आणि चैनीच्या जीवनशैलीवर खर्च केला होता. आरोपीविरुद्ध यापूर्वी दिल्ली आणि गाझियाबादमध्येही गुन्हे दाखल आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT