

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाविकांची फसवणूक करण्यासाठी अशोक खरात वेगवेगळे फंडे वापरायचा. त्यातील त्याचा २० फुटी नागाचा फंडा सध्या जोरदार चर्चिला जात आहे. त्याच्या या अजब प्रकाराला पोलिसांनी दुजोरा दिला असून, यातून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत खरात हा व्हायग्रा गोळ्यामिश्रित पाणी, ज्यास तो 'ओस्नो जल' असे संबोधायचा. तसेच रत्न खडे देऊन भाविकांची आर्थिक लूट करीत असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत.
आता २० फुटी नागाचा हा प्रकार तो भाविकांचे वशीकरण करण्यासाठी करीत होता. हा प्रकार त्याच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान येथे दररोज सायंकाळच्या सुमारास चालयचा. अंधार पडायला लागला की, तो भाविकांना एका ठिकाणी बोलवायचा. त्या ठिकाणी तंत्र-मंत्र करीत, २० फुटांचा नाग स्वतःकडे बोलवायचा. नागदेखील सरपटत त्याच्यासमोर येऊन फणा काढून उभा राहायचा.
हा नाग बघून उपस्थित भाविकांची बोलतीच बंद व्हायची. खरात सांगेल, त्या पद्धतीने नाग हालचाली करायचा. त्यानंतर खरातच्या आदेशावरून साप निघून जायचा. हा सर्व प्रकार झाल्यानंतर खरात उपस्थितांना मी नागाला वश केल्याची बतावणी करायचा. खरातचा हा चमत्कार बघून अनेक जण अचंबित व्हायचे.
खरातचा हा प्रकार बघून अनेक जण प्रभावित व्हायचे. तो सांगेल त्या पद्धतीने लोक वागायचे. पुढे त्याला बळीही पडायचे. मात्र, प्रत्यक्षात हा संपूर्ण प्रकार वेगळाच होता. हा साप खोटा होता. त्याने कागदाच्या लगद्यापासून हा साप तयार केला होता. त्यात ड्रोन यंत्रणा बसवली होती. त्याचे रिमोट तो स्वतःकडे ठेवायचा. रिमोटच्या साहाय्याने तो त्या खोट्या सापाला त्याच्या इशाऱ्यावर फिरवायचा. ही बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
अल्पवयीन पीडितेची आपबिती खरातने अल्पवयीन मुलीवरदेखील दुष्कर्म केले. या मुलीने पुढे येत आपबिती सांगितली आहे. खरातने केबिनमध्ये बोलावून घेतले. मी येताच, त्याने केबिनचा लॅच बंद करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तांब्याच्या भांड्यात पाणी मला पिण्यास दिले. त्या पाण्याची चव खूपच खारट आणि कडवट होती. पाणी प्यायल्यानंतर मला मळमळ व्हायला लागली.
मी पाणी पिण्यास नकार दिला. मात्र, खरातने मला म्हटले की, तू जेवढे जास्त पाणी पिणार, तेवढे जास्त तुला फळ मिळणार. नंतर पाणी भरलेला ग्लास त्याने माझ्या डोक्यावर ठेवून उभे राहण्यास सांगितले. तसेच गायत्री मंत्र म्हणण्यास सांगितले. मात्र, ते म्हणत असताना माझे डोके जड व्हायला लागले.
तेवढ्यात खरातने त्या रूममधील लाइट बंद केली. त्यावेळी 'मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझी राधा आहेस' असे सारखे कानाजवळ पुटपुटत त्याने जबरदस्ती केली आणि माझ्यावर बलात्कार केला. खरातला गावबंदीचा ठराव खरातच्या दर्शनाला मिरगावात अनेक नेते मंडळी येत होती. अगदी कलेक्टरपासून बडी अधिकारी मंडळी येथे बाबाच्या सेवेला हजर असायची. मिरगावातील अनेक ग्रामस्थांना खरातने दहशतीखाली ठेवले होते.
सुरुवातीला ईशान्येश्वर महादेवाच्या मंदिर संस्थानात गावातील मंडळी पूजेसाठी दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला जमायची. नंतर खरातचे कारनामे कळाल्यानंतर या लोकांनी तेथे जाणे बंद केले.
गावातील अनेक तरुणांवर खोटे आरोप करून त्यांना अटक करायलादेखील भाग पाडण्यात खरातचा हात होता असे मिरगावचे रहिवासी सांगत आहेत. आता या ईशान्येश्वर मंदिर संस्थानाचे मंडळ बरखास्त करून ते गावाच्या ताब्यात द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहेत. तसेच वर्षानुवर्षे खरातच्या दहशतीखाली दबलेले गावकरी आता निर्भयपणे पुढे येत आहेत. मिरगावात मंदिर बांधल्यानंतर खरातने एका शेतकऱ्याची वहिवाट बंद केली होती.
त्यामुळे त्याला राहते घर सोडून गेल्या आठ महिन्यांपासून पत्र्याच्या खोलीत राहावे लागत असल्याचे गावकरी सांगत आहेत. त्यामुळे अशा विकृत वृत्तीच्या व्यक्तीला पुन्हा गावात स्थान द्यायचे नाही, असा निर्धार करीत गावकरी खरातविरोधात गावबंदीचा ठराव आणणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
जाधवकडे ४० महिलांचे मोबाइल नंबर
खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवकडे तब्बल ४० महिलांचे मोबाइल नंबर असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी नीरजचा मोबाइल ताब्यात घेतला असून, तो यातील किती महिलांच्या संपर्कात होता, याचा तपास केला जात आहे. तसेच नीरजकडे मिळालेले हे नंबर खरातला बळी पडलेल्या महिलांचे तर नाहीत ना? यादृष्टीनेदेखील तपास केला जात आहे.