

12000 each to be credited to accounts cyber fraudsters open 100 accounts by hosting a feast target women bihar
पटना : पुढारी ऑनलाईन :
बिहारमध्ये सायबर फसवणूक करणाऱ्यांनी एका मॅरेज हॉलमध्ये जेवण देऊन सुमारे 100 बँक खाती उघडून घेतली. या खात्यांचा “म्यूल अकाउंट” म्हणून वापर करून या लोकांनी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले. या प्रकरणात एका बँक कर्मचाऱ्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
येथे गरीब महिलांची फसवणूक केल्याचे मोठे प्रकरण उघड झाले आहे. सायबर चोरांनी खासकरून महिलांना लक्ष्य केले. त्यांनी महिलांना सांगितले की सरकारी योजनेअंतर्गत त्यांना प्रत्येकी 12,000 रुपये मिळतील. या आमिषाला बळी पडून सुमारे 100 महिलांची बँक खाती उघडण्यात आली आणि त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी करण्यात आला.
बख्तियारपूरमध्ये या चोरानी एका मॅरेज हॉलमध्ये मेजवानी देऊन शेकडो खाती उघडली. ही खाती बँक ऑफ इंडिया (सलेमपूर व बख्तियारपूर शाखा) आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेत उघडण्यात आली. या प्रकरणात बँकेतील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
सरकारी योजनेच्या नावाखाली फसवणूक
सायबर फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण प्रकरण उघड झाले. सलेमपूर पोलिस स्टेशनच्या सायबर विभागाने या टोळीचा पर्दाफाश केला. तपासात असे आढळले की शौचालय बांधकाम, घर दुरुस्ती यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन गावातील लोकांना, विशेषतः महिलांना, बँक खाती उघडण्यास भाग पाडले जात होते.
प्रत्येक खात्यात 12,000 रुपये येण्याचे आश्वासन
फसवणूक करणाऱ्या लोकांनी महिलांना सांगितले की, 12,000 रुपये थेट खात्यात जमा होतील, म्हणून खाते उघडणे आवश्यक आहे. यासाठी मॅरेज हॉलमध्ये कार्यक्रम ठेवून 100 हून अधिक खाती उघडण्यात आली. ही टोळी सैदपूर, मुरादपूर आणि सुंदरपूर गावांमध्ये सक्रिय होती.
केवायसी प्रक्रियेद्वारे माहिती गोळा
खाते उघडताना महिलांचे फोटो, आधार कार्ड आणि फिंगरप्रिंट घेतले गेले. तपासात असे दिसून आले की एकाच फॉर्मवर वेगवेगळ्या हस्ताक्षरात माहिती भरलेली आहे. मोबाईल नंबर कापून बदलले गेले होते आणि वेगवेगळ्या रंगांच्या शाईचा वापर करण्यात आला होता, यावरून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.
महिलांना फसवण्यासाठी महिला एजंट
या प्रकरणात सीता कुमारी नावाची महिला देखील सहभागी असल्याचे आढळले. तिने गावातील महिलांना खाते उघडण्यासाठी प्रवृत्त केले. याशिवाय अवध राय, कुमारी देवी आणि विभा देवी यांचाही सहभाग असल्याचे समोर आले.
खात्यांत कोट्यवधी रुपये, पण महिलांना काहीच नाही
तपासात उघड झाले की या खात्यांचा वापर सायबर फसवणूकीतून मिळालेला पैसा जमा करण्यासाठी आणि नंतर काढण्यासाठी केला जात होता. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर या खात्यांशी संबंधित 100 पेक्षा जास्त तक्रारी नोंद आहेत. महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊन वेगवेगळ्या शहरांमधील एटीएममधून काढले जात होते. मात्र महिलांना याची काहीच माहिती नव्हती.
बँकेत गेल्यावर सत्य उघड
सरकारी योजनेचे पैसे न मिळाल्याने महिलांनी बँकेत चौकशी केली. तेव्हा त्यांच्या खात्यांवर सायबर फसवणुकीमुळे व्यवहार रोखण्यात आल्याचे समजले. यानंतर त्यांनी सलेमपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये बँक कर्मचारी धीरेंद्र कुमार याचाही समावेश आहे. तसेच चंदन कुमार आणि अवध राय यांनाही अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून बँक शाखा व्यवस्थापकांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.