मेघालयात हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशी तरुणाचा निर्घृण हत्या झाल्याची घटनेने देशाला हादरवून सोडले होते. अशाच प्रकारची घटना आता राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे.
wife killed husband
श्रीगंगानगर : संध्याकाळची वेळ होती... राजस्थानमधील आशिष आणि अंजू हे नवविवाहित जोडपे फिरायला बाहेर पडले.... अचानक भरधाव आलेल्या एका वाहनाने त्यांना धडक दिली... धडक एवढी भीषण होती की, आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर अंजूचे दागिने लुटून तिला बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर सोडून गुन्हेगार पसार झाले. वरकरणी हे 'हिट अँड रन'चे प्रकरण वाटत होते, परंतु गुन्ह्याचे गूढ उलगडल्यानंतर पोलीसही हादरले...
राजस्थानमधील धक्कादायक गुन्ह्याबाबत माहिती देताना श्रीगंगानगरच्या पोलीस अधीक्षक अमृता दुहान यांनी सांगितले की, ३० जानेवारीच्या रात्री ९ वाजता पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. रस्त्यावर एक जोडपे बेशुद्ध पडल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी आशिषला मृत घोषित केले. "आम्हाला माहिती देण्यात आली होती की, एका अज्ञात वाहनाच्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आणि तांत्रिक तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) टीमलाही पाचारण केले," असे दुहान यांनी स्पष्ट केले.
२३ वर्षीय अंजूने पोलिसांना सांगितले की, ती आणि तिचा पती संध्याकाळी फिरायला बाहेर पडले असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. तसेच तिचे सोन्याचे दागिने लुटल्याचा दावाही तिने केला. मात्र, घटनास्थळाची परिस्थिती आणि अंजूची साक्ष यात तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला. वैद्यकीय अहवालानुसार, आशिषच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या आणि त्याचा गळा आवळल्याचेही दिसून आले.
अपघातात अंजूला कोणतीही दुखापत झाली नव्हती, त्यामुळे पोलिसांचा अंजूवरील संशय बळावला. त्यांनी तिच्या फोन रेकॉर्डची तपासणी केली. घराशेजारी राहणाऱ्या संजूच्या ती सतत संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. अंजू आणि आशिषचे लग्न तीन महिन्यांपूर्वी झाले होते, पण अंजू या लग्नामुळे खुश नव्हती. लग्नानंतर ती आपल्या माहेरी गेली, तिथे ती पुन्हा तिचा माजी प्रियकर संजूच्या संपर्कात आली. याच काळात त्या दोघांनी आशिषच्या हत्येचा कट रचला. अंजूने आशिषसोबत जेवणानंतर फिरायला जाण्यास सुरुवात केली.
पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला की, ३० जानेवारीच्या रात्री अंजू आशिषला एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेली. तिथे संजू आणि त्याचे साथीदार रॉकी (रोहित) आणि बादल (सिद्धार्थ) झुडपांमध्ये लपून बसले होते. त्यांनी अचानक आशिषवर निर्घृण हल्ला केला. अंजूने तिचा प्रियकर संजू आणि इतर दोघांच्या मदतीने आशिषचा गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर या गुन्ह्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. लुटमारीचा बनाव करण्यासाठी अंजूने स्वतःचा फोन आणि कानातले आरोपींना दिले. हल्ल्यानंतर तिने बेशुद्ध असल्याचे नाटक केले. मात्र आशिषच्या शरीरावरील जखमांमुळे तिने रचलेल्या कटाचा भांडाफोड झाला. त्यामुळे आता या प्रकरणाला मेघालयप्रमाणेच राजस्थानचा 'हनिमून मर्डर' म्हटले जात आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
मे २०२५ मध्ये लग्नानंतर काही दिवसांनी राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. बारा दिवसांनंतर राजाचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह मेघालयातील जंगलात सापडला. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह (जो तिच्या कौटुंबिक व्यवसायात काम करत होता) याच्यासोबत मिळून हनिमूनवर असताना राजाला मारण्याचा कट रचला होता आणि त्याला अपघाताचे रूप दिले होते. सोनम तिथे असतानाच तीन भाडोत्री गुंडांनी 'वेई सॉडोंग फॉल्स'जवळ राजावर कोयत्याने वार केले. त्याचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला आणि फोन स्विच ऑफ करण्यात आला. हत्येनंतर काही दिवसांनी सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील एका ढाब्यावर दिसली आणि तिला ताब्यात घेण्यात आले. कुशवाह आणि इतर तीन भाडोत्री मारेकऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे; फरक फक्त इतकाच की, यावेळी मेघालय ऐवजी राजस्थान राज्य आहे.