प्रतिकात्‍मक छायाचित्र.  Pudhari
राष्ट्रीय

Supreme Court Number Plate Ruling: वाहनाची नंबर प्लेट झाकणे IPC कलम ४२० नुसार 'फसवणूक' नाही; सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणाले?

दुचाकीस्वाराविरोधातील फसवणुकीचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

पुढारी वृत्तसेवा

Supreme Court Number Plate Ruling : "वाहनाची नंबर प्लेट झाकणे ही मोटार वाहन कायद्यानुसार (MV Act) नियमांची पायमल्ली ठरू शकते; परंतु अशा उल्लंघनाला फसवणुकीच्या गुन्ह्यात रूपांतरित केले जाऊ शकत नाही. वाहनाची नंबर प्लेट झाकल्याने फसवणुकीचे आवश्यक घटक सिद्ध होत नाहीत तोपर्यंत भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ४२० खाली फसवणुकीचा गुन्हा तयार होत नाही," असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दुचाकीस्वाराविरोधातील फसवणुकीचा गुन्हा रद्द केला आहे.

काय घडलं होतं?

'बार अँड बेंच'ने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील मोहम्मद अब्दुल अहद शाकीर हे जून २०२० मध्ये दुचाकीवरून जात होते. पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी त्यांच्या दुचाकीची मागील नंबर प्लेट काळ्या मास्कने झाकलेली आढळली होती. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ८०(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. वाहतूक ई-चलान टाळण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी ही नंबर प्लेट झाकली होती, असा दावा पोलिसांनी दोषारोपपत्रात केला होता. दंडाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

सप्टेंबर २०२५ मध्ये शाकीर यांनी गुन्हेगारी कारवाई रद्द करण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत असल्याचे सांगत, कोणत्याही परिस्थितीत नंबर प्लेट झाकता येत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते. या निर्णयाला शाकीर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

...तर पुढील नंबर प्लेटही झाकली असती : याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

मोहम्मद अब्दुल अहद शाकीर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २८ जुलै २०२६ रोजी न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात शाकीरच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, दुचाकीची केवळ मागची नंबर प्लेट झाकल्याने भादंवि ४२० च्या फसवणुकीचे निकष पूर्ण होत नाहीत. जर त्यांचा उद्देश ओळख लपवण्याचा असता, तर त्यांनी पुढील नंबर प्लेटही झाकली असती, असा युक्तिवादही करण्यात आला. राज्य सरकारने या अपिलाला विरोध करत प्रथमदर्शनी गुन्हा दाखल असल्याचे सांगितले.

नंबर प्लेट झाकली म्हणून 'कलम ४२०' लावता येणार नाही!

सर्वोच्च न्यायालयाने शाकीरच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवत स्पष्ट केले की, "मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत नियमांनुसार नंबर प्लेट झाकणे हा एक नियामक भंग (Regulatory Breach) आहे. आवश्यक कायदेशीर घटक सिद्ध केल्याशिवाय या उल्लंघनाला भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा म्हणून दाखवले जाऊ शकत नाही."

फसवणुकीचा आरोप फोल ठरतो

भादंवि ४२० खालील फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी 'खोटा/कपटी हेतू', 'प्रलोभन' आणि 'मालमत्तेचे हस्तांतरण/हानी' हे मूलभूत घटक आवश्यक असतात. या प्रकरणात हे घटक सिद्ध होत नाहीत. या प्रकरणात केवळ दंड टाळण्यासाठी नंबर प्लेट झाकली होती किंवा गुन्हा घडल्यास आरोपीचा शोध घेणे कठीण होईल, हा पोलिसांचा संशय केवळ तार्किक आणि गृहीतकांवर आधारित आहे," असे खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायालयाने हेदेखील अधोरेखित केले की, केवळ मागची नंबर प्लेट झाकलेली होती, तर पुढची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत होती. यामुळे ओळख लपवण्याचा कोणताही पूर्वनियोजित कट सिद्ध होत नाही आणि कपटी हेतूचा आरोपही फोल ठरतो.

उच्च न्यायालयाचा आदेश रद्द; नियमांनुसार दंडाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवत शाकीर यांच्याविरुद्धची गुन्हेगारी कारवाई रद्द केली. तथापि, यामुळे मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ अंतर्गत दंडात्मक कारवाईतून त्यांची सुटका होणार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले. संबंधित प्राधिकरणाकडे एका महिन्याच्या आत दंडाची रक्कम जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने शाकीर यांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT