Cloudflare Outage Global Internet Issue: जगभरातील इंटरनेट युजर्स आज अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त आहेत. अनेक नामांकित वेबसाइट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी बंद पडल्या असून या मोठ्या आउटेजसाठी कंटेंट सर्व्हिस प्रोव्हायडर Cloudflare जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Canva आणि Downdetectorसह अनेक मोठ्या सेवांवर या आउटेजचा परिणाम झाला आहे. अचानक वेबसाइट्स न चालल्याने लाखो युजर्सचे महत्त्वाचे काम थांबले असून सोशल मीडियावर अनेक तक्रारी येत आहे.
Cloudflare च्या बिघाडामुळे अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आणि अॅप्स बंद झाले आहेत. Groww आणि Zerodha सारख्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सनाही याचा फटका बसला. काही युजर्सना ऑनलाइन पेमेंट्स करतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. युजर्सनी X (Twitter) वर प्रतिक्रिया देत विचारलं आहे, अचानक इतक्या सेवा बंद कशा झाल्या?
कंपनीने सांगितले की तांत्रिक बिघाडाचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे आणि डॅशबोर्ड तसेच API सेवा दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Cloudflare च्या स्टेटस पेजवरील माहितीनुसार, अनेक ग्राहकांना वेबसाइट आणि डॅशबोर्डवर एरर दिसत होते, ज्यावर आता काम केले जात आहे.
गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे अचानक अनेक वेबसाइट्स बंद पडल्या होत्या आणि त्यावेळीही Cloudflare च्या सर्व्हर्समध्ये बिघाड झाला होता. Cloudflare अनेक वेबसाइट्सचा कंटेंट होस्ट करतो. त्यामुळे त्याच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला तर जगभरातील लाखो वेबसाइट्स आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होतो.