Clean chit to Suresh Kalmadi in Commonwealth Games scam! ED has no evidence
नवी दिल्ली : सन 2010 साली नवी दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या (Common Wealth Games 2010) आयोजनात झालेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने सोमवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असून, या निर्णयामुळे मनी लाँडरिंगच्या सर्व आरोपांना न्यायालयीन सुट दिली गेली आहे.
या कथित घोटाळ्यावरून तत्कालीन काँग्रेस सरकारवर तसेच तत्कालीन क्रीडा मंत्री सुरेश कलमाडी यांच्यावर हे आरोप झाले होते. पण आता त्यांना या आरोपांतून क्लीन चीट मिळाली आहे.
सन 2010 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन क्रीडा मंत्री सुरेश कलमाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला होता. कलमाडी हे या स्पर्धांच्या आयोजन समितीचे (Organising Committee - OC) अध्यक्ष होते.
त्यांच्यासह सरचिटणीस ललित भानोत, कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम, कोषाध्यक्ष ए. के. मट्टो आणि Event Knowledge Services (EKS) कंपनीचे CEO क्रेग गॉर्डन मेलॅचाय यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते.
कथितपणे, आयोजन समितीने दोन महत्त्वाची कंत्राटे – Games Workforce Service आणि Games Planning, Project & Risk Management Services – हेतुपुरस्सर चुकीच्या पद्धतीने EKS आणि Ernst & Young यांच्या संमिश्र गटाला दिली होती.
यामुळे समितीला सुमारे 30 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि ED ने केला होता.
प्रथम CBI ने या प्रकरणात 2010 मध्ये गुन्हा दाखल केला होता. परंतु, चौकशीत कोणताही ठोस दोषारोप सिद्ध करणारा पुरावा सापडला नाही. त्यामुळे CBI ने 2014 मध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला. याच आधारे ED ने मनी लाँडरिंगचा स्वतंत्र तपास सुरू केला.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) करण्यात आलेल्या या तपासात देखील कोणताही आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाला नाही. चौकशी दरम्यान कलम ३ अंतर्गत कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसल्याने, ED नेही २०२५ मध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला.
विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी सोमवारी हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यांनी म्हटले, “ED ने सखोल तपास करूनही मनी लाँडरिंगचा कोणताही गुन्हा सिद्ध केलेला नाही. त्यामुळे सदर ECIR पुढे चालविण्याचे कारण नाही. परिणामी, ED चा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यात येतो.”
महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात
प्रकरणाचा कालावधी: 13 वर्ष
प्रमुख आरोपी: सुरेश कलमाडी, ललित भानोट, इतर अधिकारी
कंपन्या: EKS (स्वित्झर्लंड), Ernst & Young
तपास यंत्रणा: सीबीआय आणि ईडी
आर्थिक तोटा: अंदाजे 30 कोटी रूपये
ED चा निष्कर्ष: मनी लाँडरिंगचा गुन्हा सिद्ध झाला नाही
न्यायालयाचा निर्णय: क्लोजर रिपोर्ट स्वीकारला; प्रकरण समाप्त
2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांदरम्यान झालेल्या कथित भ्रष्टाचारामुळे देशात मोठा राजकीय गदारोळ झाला होता. यामुळे त्या काळात अनेक मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि काहींवर गुन्हे दाखल झाले होते.
हा घोटाळा भारतीय राजकारणात भ्रष्टाचाराचे प्रतिक म्हणून पाहिला गेला. त्यानंतरच्या काळात भाजपने यासह विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती.
तथापि, तपासातून आता काहीच समोर आलेले नाही. क्लीन चीटमुळे तपास यंत्रणा 'ईडी'विषयी रोष वाढण्याचीही शक्यता आहे.
2010 चा राष्ट्रकुल घोटाळा हा एक काळच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात नोंदविला गेलेला मोठा वादग्रस्त मुद्दा होता. आता दिल्ली न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणावर न्यायालयीन शिक्कामोर्तब झाले असून, माजी पदाधिकाऱ्यांना या प्रकरणातून सूट मिळाली आहे.