

Impact on Indian Airlines of Pakistan Airspace Closure after Pahalgam Attack
नवी दिल्ली : काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात विविध पावले उचलली. पाकिस्तानशी व्यापार बंद केला. सिंधू जलवाटप करार आणि शिमला कराराला स्थगिती दिली.
त्यानंतर पाकिस्ताननेही 24 एप्रिल 2025 रोजी भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई सीमा बंद केली.
त्यामुळे आतापर्यंत सुमारे 600 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलावे लागले आहेत. याचा परिणाम प्रामुख्याने एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या कंपन्यांच्या पश्चिमेकडील म्हणजे युरोप व उत्तर अमेरिका जाणाऱ्या उड्डाणांवर झाला आहे.
का झाला मार्ग बदल?
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही सुरक्षात्मक उपाय योजले, त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने भारतीय उड्डाणांसाठी आपली हवाई सीमा बंद केली.
परिणामी, दिल्ली, अमृतसर, जयपूर, लखनौ, श्रीनगर येथून उड्डाण करणाऱ्या विमानांना मुंबई व अहमदाबादमार्गे अरबी समुद्राच्या दिशेने वळवून मस्कतमार्गे पुढे पाठवावे लागत आहे.
उड्डाणांच्या वेळेत वाढ, इंधन खर्चात झपाट्याने वाढ
सध्या, मार्ग बदलल्यामुळे उड्डाण वेळ 15 मिनिटांपासून 1.5 तासांपर्यंत वाढत आहे. परिणामी, एकाच उड्डाणासाठी इंधनावर 1,12,500 ते 2,50,000 पर्यंत अतिरिक्त खर्च होतो आहे. जेट इंधन हा एकूण विमान खर्चाचा 25 टक्क्यांहून अधिक भाग असतो.
आर्थिक नुकसान किती?
एअरस्पेस बंदी महिनाभर राहिली तर भारतीय विमान कंपन्यांना 85–125 कोटी रु. पर्यंतचा आर्थिक फटका बसू शकतो. यात इंधन खर्च, कर्मचारी ओव्हरटाईम, मालवाहतुकीवरील मर्यादा व वेळापत्रक बिघडल्याने झालेली हानीचाही समावेश आहे.
2019 प्रमाणेच स्थिती?
2019 मध्येही पाकिस्तानने आपल्या हवाई सीमेतून भारतीय उड्डाणांना प्रवेश नाकारला होता. त्यावेळी भारतीय विमान कंपन्यांचे 540 रु. कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले होते. एअर इंडियानेच एकट्याने रु. 491 कोटींचे नुकसान सोसले होते.
केंद्र सरकारची भूमिका
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, नागरी उड्डाण मंत्रालय विमान कंपन्यांशी सतत संपर्कात असून प्रवाशांना कमीतकमी त्रास होईल यासाठी पर्यायी मार्गांचा विचार केला जात आहे.
मंत्री के. राम मोहन नायडू यांनी संकेत दिले की, "हिमालयमार्गे उत्तरेकडे मार्ग बदलण्याचा विचार केला जात आहे, परंतु त्यासाठी तांत्रिक क्षमतांची चाचपणी सुरू आहे".
तिकिट दरवाढीची शक्यता
जसजसा इंधन व मार्ग खर्च वाढतो आहे, तसतसे तिकिट दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमान कंपन्यांनी सरकारकडे सबसिडीचा पर्याय सुचवला आहे, जेणेकरून तिकीटदर वाढ टाळता येईल.