केंद्र सरकारने प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल केला असून, वरिष्ठ सनदी अधिकारी वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. File Photo.
राष्ट्रीय

IAS Transfers India| प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल, वीर विक्रम यादव DGCA चे नवे प्रमुख

IAS Transfers India| चंचल कुमार यांच्याकडे माहिती-प्रसारणाची सूत्रे, संजय लोहिया होणार अर्थ मंत्रालयाचे सचिव

पुढारी वृत्तसेवा

कर्नाटक कॅडरचे श्रीवत्स कृष्ण यांच्यावर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेश कॅडरचे नरेंद्र भूषण हे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत भू-संसाधन विभागाचे सचिव असतील.

IAS Transfers India

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल केला असून, विविध मंत्रालयांचे सचिव आणि सुमारे दोन डझन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. मंगळवारी (दि. ३१ मार्च) जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार, वरिष्ठ सनदी अधिकारी वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारचा प्रशासकीय सेवेत मोठा फेरबदल

वीर विक्रम यादव यांनी फैज अहमद किदवई यांची जागा घेतली आहे. बिहार कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी चंचल कुमार यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवेदिता शुक्ला वर्मा यांची प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या सचिवपदी वर्णी लागली आहे.

निवेदिता शुक्ला वर्मांकडे पेन्शन विभागाचा अतिरिक्त कार्यभार

निवेदिता शुक्ला वर्मा यांच्‍याकडे प्रशासकीय सुधारणा विभागासोबतच त्यांच्याकडे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. त्यापूर्वी पेट्रो-केमिकल विभागात सचिव होत्या. पंजाब कॅडरचे तेजवीर सिंह यांची रसायन आणि पेट्रो-केमिकल विभागाचे सचिवपदी नियुक्ती झाली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातील संजय जाजू यांची ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

कर्नाटक कॅडरचे श्रीवत्स यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी

कर्नाटक कॅडरचे श्रीवत्स कृष्ण यांच्यावर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेश कॅडरचे नरेंद्र भूषण हे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत भू-संसाधन विभागाचे सचिव असतील. अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव चंद्रशेखर कुमार यांची कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत 'राष्ट्रीय पर्जन्यक्षेत्र प्राधिकरण'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय लोहिया होणार अर्थ मंत्रालयाचे सचिव

वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात विशेष सचिव असणारे संजय लोहिया हे ३१ मे नंतर याच विभागात सचिव पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. तर रोहित कंसल हे ग्रामीण विकास मंत्रालयाचे नवे सचिव असतील. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी भारत हरबंसलाल खेरा हे ३० एप्रिल रोजी सचिव पद स्वीकारतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे महासंचालकपदी अभिषेक सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पर्यटन मंत्रालयाच्या सचिवपदीही अभिषेक सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने बदल्या आणि नियुक्ती प्रस्तावाला दिली मंजुरी

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समितीने मंगळवारी या सर्व बदल्या आणि नियुक्त्यांच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली. या फेरबदलामुळे आगामी काळात विविध महत्त्वाच्या मंत्रालयांच्या कामकाजात प्रशासकीय गती मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT