Shocking crime news Pudhari
राष्ट्रीय

Shocking crime news : लग्न झाले, ४ दिवस उलटले अन्...; फक्त एका सोन्याच्या चेनसाठी नववधूला जिवंत जाळले

पुरावा नष्ट करण्यासाठी अंत्यसंस्कार, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Shocking crime news

पाटणा : २३ वर्षांच्या लाडक्या मुलीचे लग्न ठरलं... घर आनंदाने न्हाऊन निघाले.... लग्नाची आमंत्रणे धाडली गेली, भेटवस्तूंची खरेदी झाली ... आठवड्याभराच्या नियोजनानंतर ३० एप्रिलपासून तिलक समारंभाने लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. त्यानंतर हळद आणि ७ मे रोजी मोठ्या थाटात लग्न पार पडले. तिचं नवआयुष्य सुरू होणार होतं; मात्र अवघ्या चार दिवसांत, सोन्याची साखळी न मिळाल्याने सासरच्या मंडळींनी तिची हत्‍या केली. संजू कुमारी असे दुर्दैवी नववधूचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. फरार पतीचा पती शोध घेत आहेत.

सोनाच्‍या चेन वगळता सर्व काही दिले

संजूच्या कुटुंबाने आपल्या आर्थिक क्षमतेबाहेर जाऊन मुलीचे लग्न लावून दिले होते. लग्नात ४ लाख रुपये रोख, एक मोटारसायकल, फ्रीज, प्रेशर कुकर, फर्निचर, पितळी व स्टीलची भांडी आणि सोन्या-चांदीचे दागिने भेट म्हणून देण्यात आले होते. माध्यमांशी बोलताना संजू कुमारीचा भाऊ शिवम पाल म्हणाला, "आम्ही सोन्याची साखळी सोडून सर्व काही दिले होते. लग्नाच्या दिवशीच वर पक्षाकडून सोन्याच्या साखळीची मागणी करण्यात आली. ती नंतर देण्याचे आश्वासन कुटुंबाने दिले, परंतु सासरचे लोक आधीच नाराज झाले होते. "तुझ्या घरच्यांनी इतके मोठे लग्न केले, पण एक साखळी देऊ शकले नाहीत," असे संजूला टोमणे मारले जात होते.

चार दिवसात मानसिक व शारीरिक छळ सुरु

लग्नानंतरचे चार दिवस संजू जिवंत होती. त्या काळात तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तिचा पती विनोद तिला मारहाण करायचा, तर सासू सुमित्रा, सासरे भिखी, नणंद किरण आणि मेव्हणे प्रमोद तिला मानसिक त्रास द्यायचे. संजूला तिच्या माहेरी बोलू दिले जात नसे. जेव्हा ती चोरून फोन करायची, तेव्हा तिला मारहाण केली जाई. तिने तिच्या भावाला फोनवर सांगितले होते, "भैय्या, मला इथे खूप त्रास दिला जातोय, माझे इथे मन लागत नाहीये." परिस्थिती हळूहळू सुधारेल, या आशेवर तिचे कुटुंब होते, असेही शिवम पालने सांगितले.

४ दिवसांचा संसार आणि धक्कादायक शेवट

संजू १३ मे रोजी माहेरी येणार होती, पण त्याआधीच ११ मे रोजी तिच्या मृत्यूची बातमी आली. शिवमने शेवटचा फोन विनोदला केला होता, तेव्हा संजूच्या माहेरी येण्याबाबत चर्चा सुरू होती. त्याच वेळी विनोदच्या आईने फोन हिसकावून घेतला आणि सांगितले, "तुमची बहीण जिवंत परत येणार नाही, आता तिची अंत्ययात्राच निघेल." त्याच वेळी मागून संजूच्या ओरडण्याचा आवाज आला आणि फोन कट झाला.

पुरावा नष्ट करण्यासाठी अंत्यसंस्कार

सासरच्या मंडळींनी संजूची गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तातडीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप संजू कुमारीच्या कुटुंबीयांनी केला. काही गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शिवमला कळवले. जेव्हा संजूचे कुटुंब तिच्या सासरी गेले, तेव्हा घराला कुलूप होते. यामुळे सासरच्यांनीच तिची हत्या केल्याचा संशय बळावला आहे. सध्या विनोद आणि त्याचे कुटुंबीय फरार आहेत.

सासूला अटक

फॉरेन्सिक (FSL) टीमने स्मशानभूमी आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. जगदीशपूर पोलीस स्टेशनचे एसएचओ सुशांत कुमार मंडल यांनी सांगितले की, िवमच्या तक्रारीवरून एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. यामध्ये पती विनोद, सासू-सासरे, नणंद आणि मेव्हणे यांची नावे आहेत. पोलिसांनी सासू सुमित्रा देवी हिला अटक केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान सुमित्रा देवीने दावा केला की, सोन्याच्या साखळीवरून वाद झाला होता, त्यानंतर संजूने आत्महत्या केली. पोलीस आता ही हत्या आहे की आत्महत्या, याचा पोलीस तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT