Boeing 737 MAX Software Glitch Pudhari
राष्ट्रीय

Boeing 737 MAX: 737 MAX विमानात मोठा तांत्रिक बिघाड; ऑटोपायलट बंद होण्याची शक्यता, भारतात 100 विमाने, कंपन्यांची चिंता वाढली

Boeing 737 MAX Software Glitch: बोईंगने 737 MAX विमानांमध्ये एका सॉफ्टवेअर समस्येची माहिती विमान कंपन्यांना दिली आहे.

Rahul Shelke

Boeing 737 MAX Software Glitch: बोईंगच्या 737 MAX विमानांमध्ये एक सॉफ्टवेअर समस्या आढळून आली आहे. काही विशिष्ट परिस्थितीत विमानाचे ऑटोपायलट अचानक बंद होऊ शकते, अशी माहिती बोईंगने आपल्या ग्राहक विमान कंपन्यांना दिली आहे. भारतात एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअरकडे मिळून या प्रकारची सुमारे 100 विमाने आहेत.

ही समस्या विमानाच्या गो-अराउंड प्रक्रियेदरम्यान उद्भवू शकते. म्हणजे विमान उतरत असताना लँडिंग रद्द करून पुन्हा हवेत झेप घेण्याची वेळ आली आणि त्यानंतर वैमानिकांनी विमानाची नियोजित उंची किंवा उड्डाणाचा मार्ग बदलला, तर अशा परिस्थितीत ऑटोपायलट सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही.

बोईंगने गेल्या महिन्यात जगभरातील 737 विमान ऑपरेटरना या समस्येबाबत माहिती दिली आहे. कंपनीने वैमानिकांना अशा परिस्थितीत काय करायचे, याबाबत आधीपासून अस्तित्वात असलेल्या सुरक्षा प्रक्रियांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बोईंगच्या प्रवक्त्याने सांगितले की, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट तयार करण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या मते, ही समस्या एका विशिष्ट लँडिंग परिस्थितीतच उद्भवू शकते.

अकासा एअरकडून सुरक्षेबाबत स्पष्टीकरण

अकासा एअरकडेही बोईंग 737 MAX ची विमाने आहेत. कंपनीने बोईंगसोबत या प्रकरणात समन्वय साधत असल्याचे सांगितले आहे. या तांत्रिक समस्येचा विमानांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होत नसल्याचे अकासा एअरने स्पष्ट केले. कंपनीची विमाने सध्या सुरक्षा नियमांचे पालन करत असल्याचेही अकासा एअरने म्हटले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडे 50 हून अधिक 737 MAX विमाने आहेत. त्यामुळे या सॉफ्टवेअर समस्येकडे कंपन्यांचे लक्ष आहे.

अमेरिकन विमान वाहतूक प्रशासनाचीही नजर

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या प्रकरणाची दखल घेतली आहे. एखादी सुरक्षा समस्या आढळल्यास तातडीने योग्य कारवाई केली जाईल, असे FAA ने स्पष्ट केले आहे. त्यासाठी सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या मंडळाची बैठक घेण्यात येणार आहे.

737 MAX आधीही चर्चेत राहिले आहे

बोईंग 737 MAX हे एअरबसच्या लोकप्रिय A320neo विमानांना टक्कर देण्यासाठी विकसित करण्यात आले होते. इंधनाची बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या विमानाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर काही काळातच हे विमान गंभीर अपघातांमुळे चर्चेत आले.

ऑक्टोबर 2018 मध्ये इंडोनेशियातील Lion Air चे 737 MAX विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यानंतर मार्च 2019 मध्ये Ethiopian Airlines चे 737 MAX विमान कोसळले. या दोन दुर्घटनांमध्ये एकूण 346 जणांचा मृत्यू झाला.

या अपघातांनंतर मार्च 2019 मध्ये जगभरातील 737 MAX विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले. बोईंगने विमानाच्या सॉफ्टवेअर आणि इतर महत्त्वाच्या प्रणालींमध्ये बदल केल्यानंतर डिसेंबर 2020 पासून या विमानांना पुन्हा उड्डाणाची परवानगी देण्यात आली.

सध्याची सॉफ्टवेअर समस्या ही त्या अपघातांशी संबंधित असल्याचे बोईंगने म्हटलेले नाही. ही विशिष्ट परिस्थितीत ऑटोपायलट सुविधा उपलब्ध न होण्याची समस्या आहे. त्यामुळे वैमानिकांना अशा परिस्थितीत विमान हाताने नियंत्रित करण्याची आवश्यक प्रक्रिया आधीच सांगण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT