

बीजिंग : दोन तासांचा मोठा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत किंवा एका तासाचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण झाला तर? ऐकायला हे एखाद्या काल्पनिक कथेसारखे वाटेल, पण तंत्रज्ञानाच्या जगात हे आता प्रत्यक्षात घडणार आहे. शेजारील देश चीनने विमान वाहतूक क्षेत्रात असे एक पाऊल उचलले आहे, जे भविष्यातील हवाई प्रवासाचे संपूर्ण चित्रच बदलून टाकेल. चीन एका अशा ‘सुपरसोनिक’ विमानाला उतरवण्याच्या तयारीत आहे, ज्याचा वेग थेट वाऱ्याशी स्पर्धा करेल.
चीन आता असे प्रवासी विमान तयार करत आहे, जे आवाजाच्या वेगापेक्षा तब्बल दुप्पट वेगाने उडू शकेल. या विमानाचा कमाल वेग ‘मॅक २’ म्हणजे जवळपास २,४७० किलोमीटर प्रतितास असेल. विशेष म्हणजे, एवढ्या प्रचंड वेगाने उडताना होणाऱ्या आवाजाचा प्रचंड धसका कमी करण्यावरही काम केले जात आहे. चीनच्या ‘TMS-10’ नावाच्या या चाचणी विमानाची असेंब्ली (जुळणी) अंतिम टप्प्यात असून, याच वर्षाच्या अखेरपर्यंत याची पहिले चाचणी उड्डाण केले जाऊ शकते. सध्या हे विमान चाचणी मॉडेल म्हणूनच बनवले जात आहे. पुढे जाऊन याच तंत्रज्ञानाच्या आधारे १० ते १५ प्रवासी क्षमतेचे व्यावसायिक विमान बनवण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यात बीजिंग ते शांघायदरम्यानचा २ तासांचा हवाई प्रवास अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण करण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे.
TMS-10 हे विमान चीनची एरोस्पेस संशोधन संस्था ‘तिआनमुशान लॅबोरेटरी’ आणि ‘बेईहांग युनिव्हर्सिटी’ यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. या विमानाची रचना करताना वेगासोबतच सर्वात मोठे आव्हान असलेल्या ‘सॉनिक बूम’ या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जेव्हा एखादे विमान आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उडते, तेव्हा हवेत अत्यंत तीव्र ‘शॉक वेव्ह्स’ तयार होतात. जमिनीवर असलेल्या लोकांना हा परिणाम एखाद्या मोठ्या स्फोटासारखा ऐकू येतो. सुपरसोनिक विमानांच्या मार्गात हे गेल्या अनेक दशकांपासून मोठे आव्हान राहिले आहे. चीनचे TMS-10 या समस्येवर मात करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर करत आहे. विमानाचे टोक आणि पंख अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की, त्याभोवती तयार होणाऱ्या शॉक वेव्हस् एकत्र येऊन एक मोठी विनाशकारी लाट बनवणार नाहीत. तसेच विमानाचा मागील भाग या लहरींना पसरवून त्यांची ताकद कमी करण्यास मदत करेल.
TMS-10 चा सर्वोच्च वेग मॅक २ (Mach 2) म्हणजेच सुमारे २,४७० किलोमीटर प्रतितास असेल. सामान्य किंवा सबसोनिक वेगावर हे विमान मॅक ०.९५ (Mach 0.95) म्हणजेच सुमारे १,१७३ किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकते.या विमानाशी संबंधित एरोडायनॅमिक विंड टनेल टेस्टस्, फ्लाईट कंट्रोल डिझाईन आणि एअरफ्रेम बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. याआधी याच्या लहान मॉडेलची कमी वेगावर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे (मॅक ०.२ पेक्षा कमी वेगाने). आता पुढील चाचणीत विमान थेट आवाजाचा वेग ओलांडेल. या दरम्यान उड्डाणाच्या वेळी किती ‘सॉनिक बूम’ निर्माण होतो आणि विमानाची तांत्रिक क्षमता कशी राहते, याचा अभ्यास वैज्ञानिक करतील.