Bihar Assembly Election | पाटणा बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) १२ उमेदवारांची दुसरी यादी आज (दि. १५) जाहीर केली आहे. पक्षाने लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांनाही उमेदवारी दिली आहे. त्या मंगळवारी (१४ ऑक्टोबर २०२५) भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. भाजपच्या दुसऱ्या यादीत अनेक जुन्या उमेदवारांचे तिकीट कापण्यात आले असून, काही नव्या चेहऱ्यांवर पक्षाने संधी दिली आहे.
भाजपने गायिका मैथिली ठाकूर यांना अलीपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. जनसुराज सोडून भाजपमध्ये आलेले माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांना पक्षाने बक्सरमधून तिकीट दिले आहे. बाढ मतदारसंघातून ज्ञानेंद्र ज्ञानू यांचे तिकीट कापण्यात आले असून, त्याऐवजी डॉ. सियाराम सिंह यांना प्रत्याशी बनवण्यात आले आहे. तसेच, छपरा मतदारसंघातून सीएन गुप्ता यांच्या जागी छोटी कुमारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने शाहपूर, अगिआंव आणि मुझफ्फरपूर या जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. शाहपूरमधून राकेश ओझा यांना संधी देण्यात आली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर मुन्नी देवी भाजपच्या उमेदवार होत्या.अगिआंवमध्ये महेश पासवान यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. २०२० च्या निवडणुकीत या जागेवर शिवेश कुमार भाजपचे उमेदवार होते.मुझफ्फरपूरमधून रंजन कुमार यांना तिकीट देण्यात आले आहे. मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश शर्मा यांना येथे पराभवाला सामोरे जावे लागले होते.