Prashant Kishor : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोरांची मोठी घोषणा, कोण जिंकणार याचेही केले भाकित
Prashant Kishor On Bihar Assembly election : ‘मी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नाही,’ अशी माहिती पूर्वश्रमीचे निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी 'पीटीआय;ला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी दिली. तसेच यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक कोण जिंकणार यांचे भाकितही केले.
निवडणूक न लढविण्याचा निर्णय का घेतला?
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी सांगितले की हा निर्णय पक्षाच्या मोठ्या हितासाठी घेण्यात आला आहे. मी निवडणूक लढवू नये, असे जन सुराज पक्षाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाने राघोपूर (तेजस्वी यादव यांचा मतदारसंघ ) येथून आणखी एक उमेदवार जाहीर केला आहे. तसेच विधानसभा निवडणूक लढवली असती तर त्यांचे लक्ष संघटनेच्या आवश्यक कामावरून विचलित झाले असते. पक्षाच्या व्यापक हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जन सुराज पक्षाची कामगिरीबाबतही व्यक्त केला अंदाज
बिहारमध्ये जन सुराज पक्षाची कामगिरी कशी असेल, या प्रश्नावर उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, "जन सुराज पक्षाला एकतर प्रचंड विजय मिळेल किंवा त्यांना मोठा पराभव सहन करावा लागेल. मला १० पेक्षा कमी जागा किंवा १५० पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान काहीही होण्याची शक्यता नाही.”
नितीशकुमार- भाजपच्या भवितव्याबाबतही केले भाकित
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दल आणि भाजप युतीचे काय होईल,या प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी अंदाज वर्तविला की, ही युती उमेदवार निश्चित करण्यात अपयशी ठरल्यामुळे एनडीए सत्तेबाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही. कारण जेडीयूसाठी चित्र आणखी निराशाजनक झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या बंडामुळे नितीश कुमार यांच्या पक्षाची संख्या ४३ पर्यंत घसरली होती, असेही त्यांनी यावेळु सांगितले.

