

Bihar Vidhan Sabha Election : निवडणूक आयोगाने आज (दि.६) बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २४३ विधानसभा जागांसाठी ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे,अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-SIR) प्रक्रियेवरही भाष्य केले. ते म्हणाले, "सुमारे २२ वर्षांनंतर बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण झाले. २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये १.६ लाख बूथ लेव्हल एजंट्सच्या (BLA) मदतीने हे काम पूर्ण झाले आहे. कोणत्याही मतदान केंद्राबाहेर मतदार आपला मोबाईल फोन जमा करू शकतो आणि मतदान झाल्यानंतर तो परत घेऊन जाऊ शकतो, असेहीज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
राज्यात एकूण जागा: २४३
खुल्या प्रवर्गासाठी जागा: २०३
अनुसूचित जमाती (ST) जागा: ०२
अनुसूचित जाती (SC) जागा: ३८
एकूण मतदार: ७.४२ कोटी
ज्येष्ठ मतदारांची संख्या: ४ लाख
१०० वर्षे पूर्ण केलेले मतदार: १४ हजार
प्रथमच मतदान करणारे मतदार: १४ लाख
निवडणूक आयोगाच्या घोषणेसह बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली. बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार आहे. अलीकडेच, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने बिहारला भेट देत निवडणुकांबाबत सर्व पक्षांकडून अभिप्राय गोळा केला. छठ आणि दिवाळीनंतर म्हणजेच ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी आता विधानसभेची रणधुमाळी उडणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, निवडणूक आयोग यावेळी मतदानासाठी मतदान केंद्रे स्थापन करेल. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी मतदारांची संख्या असेल. यावेळी, राज्यात ७४.१ दशलक्ष मतदार मतदान करतील. निवडणूक आयोग ८० वर्षांवरील मतदारांना घरी मतदान करण्याची संधी देखील प्रदान करेल. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि वृद्ध आणि अपंगांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल. या निवडणुकीत सतरा नवीन प्रयोग राबवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.