उत्तर प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलहामुळे केंद्रीय नेतृत्वही कोंडीत सापडले आहे.  Pudhari News Network
राष्ट्रीय

BJP on Yogi Adityanath | भाजपसमोर पेच: उत्तर प्रदेशात ‘योगीं’ना पर्याय नाही

अंतर्गत कलहामुळे केंद्रीय नेतृत्व कोंडीत

पुढारी वृत्तसेवा
उमेश कुमार

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलहामुळे केंद्रीय नेतृत्वही कोंडीत सापडले आहे. राज्यातील पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार आणि पक्षसंघटनेमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बदलाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पर्याय उत्तर प्रदेश भाजपमध्ये सध्या केंद्रीय नेतृत्वाला सापडत नाही.

सरकार आणि संघटनेत मोठे बदल न केल्यास परिस्थिती बिकट

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपच्या खराब कामगिरीची कारणे शोधण्यासाठी विचारमंथनाच्या अनेक बैठका झाल्या. भाजप संघटन सरचिटणीस बी.एल.संतोष यांनी उत्तर प्रदेशला भेट देऊन आपला अहवाल अध्यक्ष जेपी नड्डा यांना सादर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात संघटना आणि सरकारच्या खराब स्थितीचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, राज्यात पक्षाने लवकरात लवकर नेतृत्व बदल करावा, असा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशातील सरकार आणि संघटनेत मोठे बदल न झाल्यास आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होईल, असे संतोष यांनी अहवालात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात इतर मागासवर्गीय भाजपपासून दूर

उत्तर प्रदेशातील इतर मागासवर्गीय भाजपपासून दूर गेल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. यावर वेळीच पावले न उचलल्यास मागासवर्गीय भाजपच्या हातातून पूर्णपणे निघून जातील. तसेच काँग्रेसने राज्यात आपली स्थिती थोडी सुधारली तर उच्चवर्गही भाजपपासून दूर जाईल, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी नड्डा यांची भेट घेतली

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी भाजप हायकमांड जे. पी. नड्डा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलण्याच्या मागणी मौर्य यांनी केली, तर प्रदेशाध्यक्ष चौधरी यांनी नड्डा यांना सरकार आणि संघटना या दोघांमध्येही बदल आवश्यक असल्याचे सांगितले. याबाबत पंतप्रधान मोदींना माहिती देण्याचा सल्ला नड्डा यांनी चौधरी यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौधरी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एक तासाच्या या बैठकीत चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबाबत मत व्यक्त केले. याशिवाय पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीवरही चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT