मध्‍य प्रदेशमधील धार येथील भोजशाळा संकुल. File Photo.
राष्ट्रीय

Bhojshala ASI report | भोजशाळा येथील मशीद प्राचीन मंदिरांच्या काही भागांचा वापर करून बांधली : ASI अहवालातील माहिती

Bhojshala ASI report | बांधकामांचे आढळले तीन टप्‍पे, जुना टप्पा १० व्या ते ११ व्या शतकातील परमार काळातील

पुढारी वृत्तसेवा

अहवालातील प्रमुख निष्कर्ष

  • सध्याची ही वास्तू आधीपासून अस्तित्वात असलेल्या एका 'बेसाल्ट' रचनेवर बांधलेली. खालचा भाग आता पाया म्हणून वापरला गेला आहे.

  • बांधकामाचे तीन टप्पे आढळले असून, त्यातील सर्वात जुना टप्पा १० व्या ते ११ व्या शतकातील परमार काळातील

  • बांधकामाचा सर्वात जुना टप्‍प्‍याचे अवशेष बेसाल्टच्या शिळांनी झाकलेले

  • सर्वेक्षणात आढळलेले १०६ खांब आणि ८२ अर्ध-खांब हे मूळतः मंदिरांचे भाग असावेत असे दिसते, त्यावर देवता आणि मानवी आकृत्यांची तोडफोड केल्याच्या खुणा आहेत.

  • ९४ शिल्पे आणि त्यांच्या तुकड्यांवर विविध देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

Bhojshala ASI report |

इंदूर : मध्‍य प्रदेशमधील धार येथील भोजशाळा संकुलातील मशीद ही प्रचीन मंदिरांच्‍या अवशेषांसूनच तयार करण्‍यात आली आहे, असा निष्‍कर्ष भारतीय पुरातत्‍व विभागाने (ASI) काढला आहे. हा निष्कर्ष काढण्यासाठी पुरातत्व विभागाने वैज्ञानिक तपासणी, उत्खनन (खोदकाम), तेथील जुने दगड, शिलालेख आणि शिल्पांचा सखोल अभ्यास केला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने इंदूर उच्‍च न्‍यायालयात आपला अहवाल सादर केला आहे.

अहवाल संबंधितांना देण्‍याचे हायकोर्टाचे आदेश

धार येथील भोजशाळेत सरस्वती देवीची मूर्ती बसवण्याची आणि संपूर्ण संकुलाची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करणारी याचिका इंदूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती . तसेच येथील नमाज बंद करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती. १५ जुलै २०२४ रोजी भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) इंदूर उच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला आहे. 'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, या अहवालात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, धार येथील भोजशाळा संकुलातील सध्याचे बांधकाम हे शतकानुशतके होत गेले असून, ते करताना रचनेतील एकसारखेपणाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. सोमवारी या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हा अहवाल सर्व संबंधित पक्षांना देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती विजय कुमार शुक्ला आणि न्यायमूर्ती आलोक अवस्थी यांनी सर्व पक्षांना या अहवालावर आपली मते किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला असून, या प्रकरणाची पुढची सुनावणी आता १६ मार्च रोजी होणार आहे.

'एएसआयचा भोजशाळेचा अहवाल हिंदूंसाठी आश्‍वासक'

याचिकाकर्ते असणारे एएसआय इंदूर फ्रंट फॉर जस्टिसचे राज्य उपाध्यक्ष आशिष गोयल यांनी स्‍पष्‍ट केले की, “ भोजशाळा सर्वेक्षणातून आणि समोर आलेल्या अहवालातून असे दिसून येते की, ही संपूर्ण रचना परमार राजवंशाची आहे. ती राजा भोज आणि त्यांच्या पूर्वजांनीही बांधली होती. आता न्‍यायालयासमोर हा अहवाल आला असला तरी काही फरक पडत नाही. भोजशाळेचे धार्मिक स्वरूप काय असेल हे महत्त्वाचे आहे. यावर हिंदू समुदाय वर्षानुवर्षे संघर्ष करत आहे. ही रचना अंदाजे ९५० ते १००० वर्षे जुनी आहे. हा अहवाल हिंदू समुदायासाठी खूप आश्‍वासक आहे. लवकरच, ही निर्णायक लढाई निष्कर्षापर्यंत पोहोचेल, असा विश्‍वासही गोयल यांनी व्‍यक्‍त केला.

... तरी ही जाग आमच्‍याकडे देण्‍यात यावी : अशोक जैन

दुसरे याचिकाकर्ते भोज उत्सव समितीचे संयोजक अशोक जैन म्हणाले, " या जागेवर मशीद असेल तर मुस्‍लिम समुदायाला देण्‍यात यावी. मंदिर असेल तर ती आमच्याकडे यावी, याच मागणीसाठी आम्ही याचिका दाखल केली होती. आता न्यायालयाने सर्वांना उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. पुढील सुनावणीनंतर आम्ही योग्य ती पावले उचलू."

भारतीय पुरातत्‍व विभागाच्‍या अहवालात नेमकं काय?

उच्‍च न्‍यायालयात सादर करण्‍यात आलेला अहवाल हा १० खंडात दोन हजार पानांचा आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या (ASI) आलोक त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९८ दिवसांच्या सखोल अभ्यासातून हा विस्तृत अहवाल तयार केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या या सर्वेक्षणात ही वास्तू देवी सरस्वतीचे मंदिर असल्याचे संकेत मिळाले आहेत. संशोधनादरम्यान पथकाला ९४ शिल्पे व त्यांचे अवशेष सापडले असून, त्यातील बऱ्याच मूर्तींची तोडफोड झालेली दिसते. येथील खांब, खिडक्या आणि तुळयांवर गणेश, ब्रह्मा, नरसिंह, भैरव यांसारख्या अनेक देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच, या ठिकाणी सिंह, हत्ती, घोडा यांसारखे विविध प्राणी आणि 'कीर्तिमुख' किंवा 'व्याला' यांसारख्या पौराणिक कलाकृतींचे नक्षीकाम मोठ्या प्रमाणावर आढळले आहे.

इतिहास काय सांगतो?

धार येथे परमार घराण्याची सत्ता होती. राजा भोज यांनी येथे 1000 ते 1055 पर्यंत राज्य केले. राजा भोज हे सरस्वती देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांनी 1034 मध्ये येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे नंतर 'भोजशाळा' म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंदूंनीही याला सरस्वती मंदिर मानले. 1305 मध्ये अलाउद्दीन खिलजीने भोजशाळा उद्‍ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर 1401 मध्ये, दिलावर खान गौरीने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. १५१४ मध्ये महमूद शाह खिलजीने दुसऱ्या भागातही मशीद बांधली. 1875 मध्ये येथे उत्खनन झाल्याचे मानले जाते. या उत्खननात सरस्वती देवीची मूर्ती सापडली. ब्रिटीश अधिकारी मेजर किनकेड याने ही मूर्ती इंग्‍लंडला नेली. सध्‍या ती लंडनच्या संग्रहालयात आहे. ती परत आणण्याची मागणीही हायकोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. हिंदू संघटना भोजशाळेचे वर्णन राजा भोज काळातील वास्तू म्हणून करतात आणि तिला सरस्वतीचे मंदिर मानतात. राजवंशाच्या काळात मुस्लिमांना काही काळ येथे नमाज अदा करण्याची परवानगी होती. दुसरीकडे, मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की( ते वर्षानुवर्षे येथे नमाज अदा करत आहेत. मुस्लिम त्याला भोजशाळा-कमल मौलाना मशीद म्हणतात.

धार संस्थानाने भोजशाळेला केले होते संरक्षित स्मारक म्‍हणून घोषित

1909 मध्ये, धार संस्थानाने भोजशाळेला संरक्षित स्मारक घोषित केले. नंतर ते पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. 1935 मध्ये धार संस्थानानेच येथे शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. 1995 मध्ये येथे वाद झाला होता. त्यानंतर या परिसरात मंगळवारी पूजा करण्‍यास तर शुक्रवारी नमाज अदा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT