Bengaluru Twin Baby Death Case Pudhari
राष्ट्रीय

Twin Baby Death Case: लग्नाच्या 24 वर्षानंतर झाल्या जुळ्या मुली; 3 महिन्यांतच दोघींचा दुर्दैवी अंत, आईने असं का केलं?

Bengaluru Twin Baby Death Case: बेंगळुरूमध्ये लग्नाच्या तब्बल 24 वर्षांनंतर IVF उपचारातून जन्मलेल्या तीन महिन्यांच्या जुळ्या मुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Rahul Shelke

Bengaluru Twin Baby Death Case: लग्नाच्या तब्बल 24 वर्षांनंतर IVF उपचारांच्या माध्यमातून घरात आलेल्या जुळ्या मुलींचा अवघ्या तीन महिन्यांत दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. दक्षिण बेंगळुरूतील वज्रहल्ली परिसरात ही घटना घडली आली.

40 वर्षीय महिलेने आपल्या तीन महिन्यांच्या जुळ्या मुलींची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या घटनेत महिलेचा जीव वाचला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामलिंगप्पा या 50 वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाचे 2002 मध्ये उमादेवी यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर तब्बल 24 वर्षांनी 5 मे रोजी IVF उपचारांच्या माध्यमातून उमादेवी यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींच्या जन्मामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, काही आठवड्यांनंतर परिस्थिती अचानक बदलल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

प्रसूतीनंतर महिलेच्या वागण्यात बदल

पतीच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीनंतर सुमारे दीड महिन्यांनी उमादेवी यांचे मुलींबद्दल असणारे प्रेम कमी होत गेल्याचे जाणवले. त्या मुलींना एखाद्या आश्रमात पाठवण्याबाबत वारंवार बोलत असल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

महिलेच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. प्रसूतीनंतर होणारे मानसिक आणि हार्मोनल बदल तसेच पोस्टपार्टम डिप्रेशनशी संबंधित लक्षणे असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

पती घरी परतल्यानंतर धक्कादायक घटना उघड

मंगळवारी रामलिंगप्पा काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी सुमारे 2.45 वाजता ते घरी परतल्यानंतर घरातील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांनी तो तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी उमादेवी गंभीर अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. त्याच खोलीत दोन्ही जुळ्या मुलीही बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.

कुटुंबीयांनी मुलींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. दुसरीकडे उमादेवी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचा जीव वाचल्याचे समोर आले आहे.

मुलींचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांचा तपास सुरू

रुग्णालयातील प्राथमिक तपासणीत मुलींचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कुटुंबीयांनीही घरातील पाण्याच्या बादलीवरून संशय व्यक्त केला आहे. मात्र, मुलींच्या मृत्यूचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम अद्याप तपासातून स्पष्ट झालेला नाही.

तलघट्टापुरा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, वैद्यकीय अहवाल आणि कुटुंबीयांचे जबाब याच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

कुटुंबावर मोठे संकट

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल 24 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर IVF उपचारांमधून जन्मलेल्या जुळ्या मुलींचा इतक्या कमी कालावधीत मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. प्रसूतीनंतर महिलेच्या मानसिक अवस्थेत नेमके कोणते बदल झाले होते आणि या घटनेमागील कारण काय होते, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, प्रसूतीनंतर मानसिक किंवा भावनिक बदल जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT