

Hyderabad Nurse Murder Case : हैदराबादमधील पहाडीशरीफ भागात एका नर्सवर अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका मोटारसायकल मेकॅनिकला अटक केली आहे. हत्येसारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर आरोपीने अत्यंत थंड डोक्याने आपल्या गॅरेजमध्ये जाऊन गाढ झोप घेतल्याचे निष्पन्न झाल्याने तपास अधिकारीही सुन्न झाले आहेत. पीडित महिला झोपेत असताना आरोपीने खिडकीतून आत प्रवेश करून हे कृत्य केले.अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा बिहारचा असून तो २०२३ मध्ये रोजगारासाठी हैदराबादमध्ये आला होता.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या महिनाभरापासून नर्सच्या हालचालींवर पाळत ठेवून होता. घटनेच्या रात्री महिला तिच्या खोलीत झोपलेली असताना आरोपी खिडकीतून आत शिरला. तिने त्याच्या विकृत कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर आरोपी पुन्हा त्याच खिडकीतून बाहेर पडून गॅरेजमध्ये गेला आणि आरामात झोपून राहिला."गुन्ह्याच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. कृत्य केल्यानंतर तो गॅरेजमध्ये गेला आणि झोपला. सुरुवातीला त्याने या गुन्ह्यात आपला कोणताही हात नसल्याचा आव आणला होता," अशी माहिती पोलिसांनी दिली.
अत्याचार झाला तेव्हा महिला जिवंत होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "हत्या केल्यानंतर अत्याचार झाला की आधी, हे वैद्यकीय तपासणीअंतीच स्पष्ट होऊ शकेल." तथापि, अत्याचार करताना महिला बेशुद्ध होती, असा दावा आरोपीने पोलिसांसमोर केला आहे.पीडितेच्या खोलीच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीजवळच आरोपीचे गॅरेज आहे. महिनाभरापूर्वी त्याने खिडकीतून पीडितेला पाहिले होते आणि तेव्हापासूनच तो तिच्यावर लक्ष ठेवून होता.
नर्सचा फोन लागत नसल्याने तिच्या एका मैत्रिणीने काही सहकाऱ्यांसह तिच्या खोलीवर धाव घेतली. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. सुरुवातीला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला नकार देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोबाईल टॉवर डेटा आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.घटनास्थळावरून केसांचे नमुने आणि इतर फॉरेन्सिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पीडित महिला गेल्या सात महिन्यांपूर्वीच हैदराबादमध्ये नर्स म्हणून रुजू झाली होती. आरोपीचा भूतकाळात काही गुन्हेगारी दाखला आहे का, याची पडताळणी बिहार पोलिसांच्या मदतीने केली जात आहे.