Crime News Pudhari
राष्ट्रीय

Shocking Crime News : प्रेमसंबंधाला विरोध; पोटची मुलगी बनली कसाई! लहान बहिणीसह आई-वडिलांना संपवले!

प्रियकराच्या मदतीने केली भयंकर कृत्‍य, तिहेरी हत्याकांडाने बंगळूरु हादरले

पुढारी वृत्तसेवा

Bengaluru Triple Murder : येथील एकाच कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमसुंदर (५५), त्यांची पत्नी मुथुलक्ष्मी (४८) आणि त्यांची लहान मुलगी सुप्रिया (२०) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांचीही भोसकून हत्या करण्यात आली. कुटुंबातील मोठी मुलगी श्वेता आणि तिचा प्रियकर केनेथ यांनी मिळून हे हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे समजते. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांचा त्‍यांचा शोध घेत आहेत.

प्रेमसंबंधांना आई-वडिलांचा होता विरोध

केआर पुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीगेहल्ली येथील धामणीक लेआउटमधील 'साई ग्रीन अपार्टमेंट'मध्‍ये सोमसुंदर हे पत्‍नी आणि दोन मुलींसह राहत होते. त्‍यांची मोठी मुलगी श्वेता तिच्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, तिचे आई-वडील सोमसुंदर आणि मुथुलक्ष्मी नात्याच्या विरोधात होते.

तपासात काही धक्‍कादायक तपशील समोर

तपासादरम्यान या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक तपशील समोर आले आहेत. आरोपी श्वेतावर सुमारे ३० लाख रुपयांचे कर्ज होते. या वाढत्या कर्जावरून तिचे आई-वडील तिला वारंवार जाब विचारत असत, ज्यामुळे कुटुंबात सातत्याने वाद होत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

आधी आईची हत्‍या

सोमवारी जेव्हा फक्त आई मुथुलक्ष्मी घरात एकटीच होती, तेव्हा श्वेता आणि केनेथ तिच्या घरी आले होते. तिचे वडील सोमसुंदर आणि लहान बहीण सुप्रिया हे दोघे बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर श्वेता, केनेथ आणि मुथुलक्ष्मी यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान मुथुलक्ष्मीवर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर, वडील आणि बहीण घरी परतण्यापूर्वी आरोपींनी बाथरूममध्ये जाऊन रक्ताचे डाग धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

बहिणीसह वडिलांनाही संपवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान बहीण सुप्रिया जेव्हा घरात आली, तेव्हा श्वेताने तिला घट्ट पकडून ठेवले आणि केनेथने तिच्यावर शस्त्राने वार करत तिचा जीव घेतला.त्यानंतर वडील सोमसुंदर घरात आले असता त्यांच्यावरही त्याच शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झाले असतानाही सोमसुंदर यांनी कसेबसे घराबाहेर धाव घेत मदतीसाठी आवाज दिला, मात्र दुर्दैवाने नंतर त्यांचा मृत्यू झाला. केआर पुरम पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपीच्‍या शोधासाठी पथके रवाना

सध्या फरार असलेल्या श्वेता आणि केनेथचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. हत्येचा नेमका हेतू आणि घटनाक्रम तपासला जात आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, मात्र अद्याप त्याचा सविस्तर तपशील समोर आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT