

Thane crime news
ठाणे: डॉक्टर पती आणि सासरच्या मंडळींकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ, तसेच घरभर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ठेवली जाणारी सततची पाळत यामुळे त्रस्त झालेल्या २६ वर्षीय विवाहितेने लग्नानंतर अवघ्या ४८ दिवसांत जीवन संपवले. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. विशाखा टिळकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विशाखा टिळकर हिचा विवाह ३० एप्रिल रोजी नितीन टिळकर याच्याशी झाला होता. विवाहापूर्वी सर्व काही सुरळीत होते, मात्र लग्नानंतर परिस्थिती बदलल्याचा दावा विशाखाच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नावेळी अपेक्षित भेटवस्तू आणि मान-सन्मान मिळाला नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विशाखाचा छळ सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विशाखावर माहेरहून पैसे आणि दागिने आणण्यासाठी सतत दबाव टाकला जात होता. याशिवाय, पती नितीन याने घराच्या आत आणि बाहेर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले होते. त्यामुळे तिचे वैयक्तिक आयुष्य आणि गोपनीयता पूर्णपणे हिरावली गेली होती.
विशाखा शेजाऱ्यांशी किंवा इतर कोणाशीही बोलली तरी घरी आल्यानंतर पतीकडून तिला मारहाण केली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. टोकाचा निर्णय घेण्याआधी दोन दिवस केवळ शेजारच्या एका महिलेसोबत बोलल्यामुळे तिला निर्दयपणे मारहाण केली होती. विशाखाने तिच्या आईला आपण सहन करत असलेल्या छळाची माहिती दिली होती. कुटुंबीय तिला परत माहेरी आणणार होते, मात्र त्याआधीच तिने गळफास घेऊन जीवन संपवले.
या प्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नितीन टिळकर, त्याची आई छाया टिळकर आणि भाऊ निनाद टिळकर यांच्याविरोधात मानसिक व शारीरिक छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नितीन टिळकर याला अटक केली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.