Azamgarh Massacre Inside Story: उत्तर प्रदेशातील आजमगडमध्ये मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला. घरात सुरू असलेल्या महामृत्युंजय जपादरम्यान पंडितांकडून आधार कार्ड मागण्यावरून सुरू झालेला वाद काही वेळातच रक्तरंजित झाला. या घटनेत आरोपी अरविंद सिंह याने पत्नी, दोन पंडित आणि आपल्या मुलाची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलांना ओलीस ठेवून तो घरातील एका खोलीत बंद झाला. अखेर पोलिस आणि ATS कमांडोंच्या संयुक्त कारवाईत अरविंदचा मृत्यू झाला.
आजमगडच्या अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुर गावात ही घटना घडली. या घटनेला 2019ची पार्श्वभूमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदचा भाऊ सुनील सिंह याची 2019 मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात अरविंदच्या चुलत भावांवर आरोप झाले होते. त्यांना न्यायालयीन कारवाईनंतर शिक्षा झाली होती. नुकतेच ते जामिनावर बाहेर आले होते.
सुनीलच्या हत्येनंतर कुटुंबातील सदस्य मानसिक तणावात असल्याचे सांगितले जाते. याच काळात अरविंदची पत्नी बबीता आणि त्याची आई यांनी पंडितांशी संपर्क साधला. सुनीलची आत्मा कुटुंबाला त्रास देत असल्याचे पंडितांनी सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. त्यानंतर घरात पाच दिवसांचा महामृत्युंजय जप सुरू करण्यात आला.
मंगळवारी महामृत्युंजय जपाचा चौथा दिवस होता. घरात पंडितांकडून पूजा सुरू होती. त्यावेळी अरविंद बाजारातून घरी परतला.
घरात पूजा सुरू असल्याचे पाहून तो संतापला. त्याने पंडितांना पूजा का सुरू आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. अरविंदने पंडितांकडे आधार कार्ड मागितल्याचे सांगितले जाते. या मुद्द्यावरून घरातील वातावरण आणखी तापले.
अरविंद या पूजेला सुरुवातीपासूनच विरोध करत होता. त्याने पंडितांना दुसऱ्या दिवशी पुन्हा घरी येऊ नका, असा इशाराही दिल्याचे सांगितले जाते.
पंडितांकडे आधार कार्ड मागण्यावरून अरविंदची पत्नी बबीता हिच्याशीही वाद झाला. यावेळी अरविंदने आपल्या भावाच्या हत्येसाठी पत्नीला जबाबदार धरत तिच्यावर संताप व्यक्त केला.
वाद वाढत असतानाच त्याने घरातील परवानाधारक पिस्तूल बाहेर काढले आणि गोळीबार केला. या गोळीबारात बबीता यांच्यासह दोन पंडितांचा मृत्यू झाला. मृत पंडितांची ओळख महेंद्र पाठक आणि अखिलेश मिश्रा अशी करण्यात आली आहे.
गोळीबारानंतर अरविंदने आपल्या मुलांना घेऊन घरातील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. त्याच्याकडे शस्त्र असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच SOG आणि ATSच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घराबाहेर जमले.
पोलिसांकडून अरविंदला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, तो मुलांना मारण्याची धमकी देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संध्याकाळी साधारण ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हा प्रकार मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. शंभूपुर गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
अरविंद खोलीत असल्याने पोलिसांना अत्यंत सावधपणे कारवाई करावी लागत होती. त्याच्याकडे शस्त्र असल्याने थेट कारवाई केल्यास मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. दरम्यान, खोलीतून गोळीबाराचा आवाज आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.
वाराणसी झोनचे ADG नवीन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बराच वेळ संयमाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. कमांडोंच्या मदतीने मुलांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू होते.
याचदरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदने आपल्या मुलावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी मुलांना वाचवण्यासाठी कारवाई सुरू केली.
ATS आणि SOGच्या संयुक्त पथकाने खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अरविंदने पोलिसांवरही गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. यात अरविंद गंभीर जखमी झाला.
रात्री उशिरा त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. रात्री साडेतीनच्या सुमारास एसएसपी डॉ. अनिल कुमार यांनी आरोपीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात 2019 मधील सुनील सिंह यांच्या हत्येचा संदर्भ महत्त्वाचा ठरत आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्या घटनेनंतर घरात भीतीचे वातावरण होते. सुनीलची आत्मा कुटुंबाला त्रास देत असल्याचे सांगितल्यानंतर महामृत्युंजय जपाचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, याच पूजेच्या चौथ्या दिवशी घरातील वादाने भीषण स्वरूप घेतले. पंडितांकडून आधार कार्ड मागण्यापासून सुरू झालेला वाद काही मिनिटांतच गोळीबारात बदलला आणि त्यानंतर अनेकांचा जीव गेला. या घटनेमुळे शंभूपुर गावात अजूनही भीतीचे वातावरण असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.