बांगला देशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी शेख हसीना यांच्या धोरणांवर टीका केली आहे.  File photo
राष्ट्रीय

Bangladesh news | 'इस्लामी कट्टरपंथीय...' शेख हसीनांच्या बांगला देश सोडण्यावर तस्लिमा नसरीन यांची पोस्ट चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

आरक्षणविरोधी आंदोलन आणि यातून पेटलेल्या संघर्षातून (Bangladesh news) अखेर बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. जनतेच्या उठावाने त्यांची सत्ता उलथवून टाकली. हजारो आंदोलकांनी सोमवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करताच हादरलेल्या शेख हसीना यांनी तातडीने राजीनामा दिला आणि त्यांनी लष्कराच्या विमानाने बांगला देशातून काढता पाय घेतला. त्या आता भारतमार्गे लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर बांगला देशी लेखिका आणि मानवतावादी कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन (Author Taslima Nasreen) यांनी शेख हसीना यांच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. (sheikh hasina news)

''माझी आई मृत्यूशय्येवर होती. तिला पाहण्यासाठी मी बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर इस्लामी कट्टरपंथियांना खूश करण्यासाठी हसीना यांनी मला १९९९ मध्ये माझ्या देशातून बाहेर काढले. मला पुन्हा कधीही माझ्या देशात प्रवेश करु दिला नाही. तेच इस्लामी कट्टरपंथीय विद्यार्थी चळवळीत आहेत; ज्यांनी आज हसीनाला देश सोडण्यास भाग पाडले.'' असे तस्लिमा नसरीन यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

''हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. त्यांच्या या परिस्थितीला त्या स्वतः जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच इस्लामी कट्टरपंथीय वाढले. त्यांनी आपल्या लोकांना भ्रष्टाचारासाठी मोकळीक दिली. आता बांगला देश पाकिस्तानसारखा होऊ नये. देशाची सत्ता लष्कराने हाती घेऊ नये. राजकीय पक्षांनी देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता आणावी.'' असे नसरीन यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

तस्लिमांना का सोडावा लागला होता बांगला देश?

लेखिका तस्लिमा नसरीन यांना १९९४ मध्ये त्यांच्या "लज्जा" या कादंबरीवरून कट्टरपंथीय संघटनांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे त्यांना बांगला देश सोडावा लागला. या कादंबरीवर बांगला देशात बंदी घालण्यात आली होती. हसीनांना तुरुंगात टाकलेल्या त्यांच्या कट्टर विरोधक खालिदा झिया त्या वेळी बांगला देशच्या पंतप्रधान होत्या.

bangladesh protest reason : अन् हसीनांनी बांगला देशातून काढता पाय घेतला

मागील दोन महिन्यांपासून बांगला देशात आरक्षणाच्या विषयावरून आंदोलन सुरू होते. बांगला देश मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना सरकारी नोकर्‍यांत आरक्षण देण्यावरून या आंदोलनाचा भडका उडाला. त्यात ३०० हून अधिकजण मरण पावले. आरक्षण देण्याचा निर्णय स्थगित केल्यावर काही दिवस बांगला देश शांत होत असतानाच हिंसाचार प्रकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. या नव्या आंदोलनातही ९२ जण मरण पावले. सोमवारी लाँग मार्चची घोषणा करण्यात आली. बांगला देशच्या विविध भागांतून लाखो तरुण व नागरिक ढाक्याकडे निघाले असतानाच हजारो आंदोलकांनी थेट पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या गण भवनकडे कूच केले. हजारो आंदोलकांनी सोमवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करताच हादरलेल्या शेख हसीना यांनी तातडीने राजीनामा दिला आणि त्यांनी लष्कराच्या विमानाने बांगला देशातून काढता पाय घेतला. (what happened in bangladesh)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT