बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या सरकारविरोधात गेल्या १५ दिवसांपासून असंतोष उफाळत होता. पहिल्या टप्प्यातील बांगलादेश युद्धातील वारसांचे आरक्षण रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शांततेचे आंदोलन (Bangladesh Protest) सुरू केले होते. या आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांचा बळी गेला होता. बळाचा वापर करून पोलिसांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये बांगलादेशात तणावपूर्ण शांतता होती.
विद्यार्थ्यांचे आंदोलन (Bangladesh Protest) शमल्यासारखे दिसत असतानाच शेकडो निदर्शकांचा मोर्चा पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या राजीनाम्यासाठी रविवारी रस्त्यावर आला होता. या आंदोलनामध्ये ३०० हून अधिक जणांचा बळी गेला. पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप करीत आंदोलकांनी शुक्रवारपासून अभूतपूर्व आंदोलन छेडले होते. १५ वर्षांची राजवट उलथवून टाकण्यात आंदोलकांना यश आले होते. निदर्शकांनी सोमवारी ढाक्याच्या दिशेने कूच करीत लाँग मार्च काढला होता. दरम्यान, शेख हसीना यांना आंदोलनकर्त्यांवर दंगलखोरीचा आरोप केला असून जनतेनेच त्यांना धडा शिकविण्याचे आवाहन केले आहे. बांगला देशातील आंदोलकांनी ढाक्याला कूच केल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रासादावर कब्जा घेतली. अवघ्या ९ मिनिटांमध्ये आंदोलकांनी सत्ता उलथवून टाकली.
सर्वात आधी पाकिस्तानात आंदोलकांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार उलथवून टाकले होते. त्यानंतर श्रीलंका सरकारविरोधातही अशाच प्रकारच्या आंदोलनाची पुनरावृत्ती झाली होती. पाकिस्तान आणि श्रीलंकेपाठोपाठ बांगला देशातील सत्ता आंदोलकांनी (Bangladesh Protest) उलथवून टाकली आहे. तिन्ही देशांतील परिस्थिती भिन्न असली, तरी स्क्रिप्ट एकच आहे. प्रस्थापित सरकारविरोधातील रोष तिन्ही देशांतील आंदोलनातून समोर आला आहे. दक्षिण आशियातील या तिन्ही देशांमध्ये अनेक वेळा बंडाळी झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. या तिन्ही देशांतील आर्थिक संकटामुळे आंदोलक रस्त्यावर आल्याची प्रचिती आली आहे. जाती, धार्मिक आणि विद्वेष ही या देशांतील आंदोलनास कारणीभूत ठरले आहेत. पाकिस्तानात अनेक वेळा लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्याचा इतिहास आहे. श्रीलंकेतील सत्तांतरानंतर लष्कराने सत्ता घेतल्याचे उदाहरण आढळत नाही.
बांगला देशात याआधी १५ ऑगस्ट १९७५ साली सत्ता उलथवून टाकण्यात आली होती. बांगला देशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्येनंतर सरकार उलथवून टाकण्यात आले होते. १९८१ साली जिया उर रेहमान यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतरही लष्कराने कब्जा घेण्याचा प्रयत्न केला होता.