Ashok Gehlot Conspiracy Claim: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जुन्या कढीला नव्यानं ऊत आणला आहे. त्यामुळं काँग्रेसचे राजकारण ढवळून निघणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गहलोत यांनी ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र एका षडयंत्रामुळं सगळं काही उलटलं. लोकांना आज देखील याबाबतचं संपूर्ण सत्य माहिती नाहीये असा दावा अशोक गहलोत यांनी केला.
जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना अशोक गहलोत म्हणाले की, 'मला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापासून रोखण्यासाठी एक षडयंत्र झालं होतं. मी तर राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास तयार होतो. मी का नकार देईन.'
राजस्थानच्या राजकारणात २०२० आणि २०२२ या दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत अशोक गहलोत आता व्यक्तव्य करत आहेत. त्यामुळं त्यांच्या टायमिंगबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेतृत्वाने आता निर्णायक आणि कडक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी मिळून काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी काही मोठा निर्णय घेत आहेत. केरळमचे मुख्यमंत्रीपद असो वा कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलणे असो या निर्णयावरून याची प्रचिती येते.
त्याचबरोबर काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदावारांचे नाव देखील जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक गहलोत जुन्या घटनांना नव्याने चर्चेची फोडणी देऊन काय राजकीय गेम करू इच्छितात अशी चर्चा सुरू झाली आहे.
गहलोत आता स्पष्टीकरण देऊन आपली बाजू सेफ करून घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना? काँग्रेसच्या संघटनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटकात डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. आता प्रदेश काँग्रेसची धुरा देखील नव्या नेत्याकडे देण्यात आली आहे. आता राजस्थानमध्ये देखील असेच होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गहलोत आता मल्लिकार्जुन खरगेंच्या जागेवर डोळा ठेवून ही वक्तव्ये करत आहेत का अशी देखील चर्चा सुरू झाल्या आहेत.
वरिष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी माध्यमांसमोर वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडिया एक्सवर देखील एक पोस्ट केली. अशोक गहलोत म्हणतात, 'ज्या पदावर कामराज, महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते राहिले असतील आणि सोनिया गांधी जर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या असतील तर मी का नाही म्हणेन? त्यावेळी परिस्थिती अशी झाली की... ते एक षडयंत्र होतं. अचानक ऑब्जर्वर आले. तमाशा झाला आणि माझी बदनामी झाली.'
अशोक गहलोत यांनी जर मी हायकमांडविरूद्ध बंडखोरी केली होती तर मी मुख्यमंत्रीपदावर राहू शकलो असतो का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. अशोक गहलोत यांनी हिंदुस्तानाच्या इतिहासात ज्यावेळी देखील हायकमांडने मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहेत त्यावेळी ९० टक्के आमदार जुना मुख्यमंत्री सोडून नव्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेले आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांचे काम तर नवा मुख्यमंत्रीच करणार आहे. कोणी थांबत नाही.
अशोक गहलोत यांचे म्हणणे आहे की २५ डिसेंबर २०२२ मध्ये ही घटना त्या व्यक्तीविरोधात झाली ज्याचे नाव मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं बाहेर आलं होतं. पायलट साहेब यांचे नाव त्यांच्या स्वतःच्याच लोकांनी पुढं केलं असं वातावरण तयार करण्यात आलं की १०० आमदार बाजूने आहेत.
ज्यावेळी २०२२ मध्ये काँग्रेस अध्यक्ष पदाची निवड होणार होती. राहुल गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा करणार होते. सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष होत्या. पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला होता. सोनिया गांधी यांना अशोक गहलोत काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत अशी इच्छा होती. मात्र यासाठी त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार होते. त्यावेळी गहलोत मुख्यमंत्री अन् काँग्रेसचे राष्टीय अध्यक्ष होण्यास तयार आहेत असं समोर आलं होतं.
मात्र राहुल गांधी यांनी उदयपूर चिंतन बैठकीत एक व्यक्ती एक पद याचे पक्ष सक्तीने पालन करणार असं सांगितलं. त्यामुळं गहलोत यांना राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवण्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार होतं.
त्यावेळी काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना ऑब्जर्वर म्हणून राजस्थानात पाठवलं. त्यावेळी हे दोन नेते त्वरित आमदारांची बैठक बोलावून एका ओळीचा प्रस्ताव पास करून घेणार होते. यात विधिमंडळ नेत्याचा निर्णय तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर सोपवण्यात यावा असं लिहिले होते.
मी दोन्ही नेत्यांना एक दिवसानंतर बैठक बोलवण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांनी मान्य केलं नाही आणि प्रस्ताव पास झाला नाही. मी सोनिया गांधी यांची भेटून माफी मागितली. अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्याबाबत देखील वक्तव्य केलं त्यांनी चूक मनुष्याकडूनच होते. मी देखील चूक करू शकतो. त्यांनी चूक केली तर ती स्विकार करायला हवी होती. त्या दिवशी सचिन पायलट यांना माझ्या भावना समजल्या असत्या. माझी चूक नव्हती त्यांची चूक आहे असं मी म्हणत नाही.