Army chief General Upendra Dwivedi on operation sindoor
चेन्नई : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने केवळ लष्करी पातळीवर नाही तर ‘नॅरेटिव्ह मॅनेजमेंट’ म्हणजेच कथानक व्यवस्थापनाच्या माध्यमातूनही पाकिस्तानला मात दिली, असे मत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले.
आयआयटी मद्रासमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानच्या कथानकाच्या रणनीतीवर जोरदार टीका केली.
“जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानीला विचारलंत की आपण जिंकलो की हरलो, तर तो म्हणेल – आमचा प्रमुख फील्ड मार्शल बनलाय, म्हणजे आपणच जिंकलो असणार,” असे म्हणत त्यांनी पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या प्रमोशनवर उपरोधिक शैलीत टोला लगावला.
“विजय हा प्रत्यक्ष लढाईत नसतो, तो मनात असतो. म्हणूनच कथन व्यवस्थापन (Narrative Management) खूप महत्त्वाचं ठरतं. यामुळेच स्थानिक नागरिक, शत्रु देश आणि तटस्थ आंतरराष्ट्रीय समुदाय यांच्यावर प्रभाव पडतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताकडून सोशल मिडिया आणि इतर माध्यमांचा प्रभावी वापर करत "Justice Done" हा ठाम संदेश जागतिक पातळीवर पोहचवण्यात आला. हा संदेश जगभरात सर्वाधिक ‘हिट्स’ मिळवणारा ठरल्याचं लष्करप्रमुखांनी नमूद केलं.
दोन महिला अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांपासून ते एका लेफ्टनंट कर्नल व एनसीओने तयार केलेल्या प्रतीक चिन्हापर्यंत – संपूर्ण संदेश व्यवस्थापन ही एक ठोस आखणी होती, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, ही एक पारंपरिक युद्धाची रणनीती नव्हती, तर ती ‘ग्रे झोन’मधील कारवाई होती – म्हणजेच सरळ सरळ युद्ध नसलेली, पण शत्रुला चक्रावून टाकणारी अशी युद्धनीती होती.
“आपण आणि शत्रु – दोघंही एकमेकांच्या चाली समजण्याचा प्रयत्न करत होतो. काही ठिकाणी आपण शत्रुला ‘चेकमेट’ केलं. काहीवेळा जोखमीचा निर्णय घेतला. पण हेच जीवन आहे,” असे ते म्हणाले.
ऑपरेशनच्या यशामध्ये राजकीय स्पष्टता आणि स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं ठरल्याचे लष्करप्रमुखांनी अधोरेखित केले. “23 एप्रिलला झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट सांगितले – ‘Enough is enough’. त्यानंतर आम्हाला पूर्ण मोकळीक देण्यात आली,” असे त्यांनी सांगितले.
या स्वातंत्र्यामुळे भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यांनी मैदानात योग्य निर्णय घेतले आणि कोणतीही राजकीय अडथळा नसल्यामुळे कार्यवाही प्रभावी झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची निर्घृण हत्या केली. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली.
त्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाक-व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हवाई हल्ले करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा केला. यातील तीन प्रमुख आरोपींना ऑपरेशन महादेव अंतर्गत शोधून काढून ठार करण्यात आले.