

Pakistan airspace closure
इस्लामाबाद: भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना प्रवेश नाकारला, ज्यामुळे पाकिस्तान एअरपोर्ट्स अथॉरिटीला तब्बल ₹4.10 अब्ज (410 कोटी रुपये) नुकसान सहन करावे लागले आहे. ही माहिती पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय सभेमध्ये दिली आहे.
24 एप्रिल ते 20 जून 2025 दरम्यान पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. या निर्णयाचा थेट परिणाम दररोज उड्डाण करणाऱ्या 100 ते 150 भारतीय विमानांवर झाला. परिणामी, पाकिस्तानच्या एकूण हवाई वाहतुकीत 20 टक्के घट झाली व "ओव्हरफ्लायिंग चार्जेस" अर्थात आंतरराष्ट्रीय विमानांकडून घेतल्या जाणाऱ्या हवाई शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली.
पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई बंदी 24 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली आहे, तर भारतानेही 23 ऑगस्ट 2025 पर्यंत पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश नाकारला आहे. भारताचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे जाहीर केलं.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी स्पष्ट केलं की, याआधी सांगितलेला 8.5 अब्ज (850 कोटी) तोट्याचा अंदाज खरा नसून प्रत्यक्षात हवाई शुल्कातून झालेलं नुकसान 4.10 अब्ज इतकंच आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जलवाटप करार एकतर्फी रद्द केला. त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि पाकिस्तानबरोबरचे सर्व प्रकारचा व्यापार बंद केले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले.
लश्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या TRF (The Resistance Front) या शाखेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.
भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत चाललेला तणाव आणि त्याचे परिणाम केवळ सीमित लष्करी पातळीवर राहत नाहीत, तर त्याचा आर्थिक फटका दोन्ही देशांना सहन करावा लागत आहे. हवाई क्षेत्र बंदी हा त्याचाच एक गंभीर परिणाम आहे, ज्यातून पाकिस्तानला मोठ्या महसुली नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे.