अनिल साक्षी
जम्मू : समुद्रसपाटीपासून सुमारे १४ हजार ५०० फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेतील बर्फापासून बनलेल्या शिवलिंगाची उंची दोन महिन्यांपूर्वी २० ते २२ फूट होती. मात्र, सध्या ती केवळ ८ फुटांवर आली आहे. मूळ शिवलिंगाची जाड भाग जो असतो, त्याची उंची ६ ते ८ फूट इतकी असते. पण त्यावर गोठलेल्या बर्फाची काही काठी वरपर्यंत गेलेली दिसते.
स्थानिक लोक त्यालाही शिवलिंगाचा भाग मानतात. त्यामुळे त्याची उंची धरली तर ही उंची साधारण दोन महिन्यांपूर्वी २० ते २२ फूट इतकी होती. पण आता ती ७ ते ८ फुटांवर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रावण पौर्णिमेपूर्वीच शिवलिंग पूर्णपणे वितळून जात असल्याचे दिसते.
वाढते जागतिक तापमान, हवामानातील बदल आणि यात्राकाळात गुहेत पोहोचणाऱ्या लाखो भाविकांमुळे परिसरातील तापमान वाढत असल्याने हिमलिंग वितळण्याचा वेग वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी २०१३, २०१६ आणि २०१८ या वर्षातही शिवलिंग नियोजित यात्रा संपण्यापूर्वीच नाहीसे झाले होते. विशेषतः २०१६ मध्ये यात्रा सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत शिवलिंगाची उंची दीड फुटांवर आली होती.
पहिला जत्था २ जुलैला जम्मूवून रवाना होणार
यंदाची अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार असून, पहिला अधिकृत जत्था २ जुलै रोजी जम्मूमधील भगवतीनगर येथील यात्री निवासातून रवाना होणार आहे. विविध राज्यांतील भाविक जम्मूमध्ये दाखल होऊ लागले असून, सुरक्षा कारणास्तव सरस्वती धाम आणि वैष्णवी धाम येथे सर्वसामान्यांच्या प्रवेशावर तात्पुरती निर्बंध घातले आहेत. सुरक्षा यंत्रणा आणि भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास असल्याचे अनेक भाविकांनी स्पष्ट केले.
नोंदणी
यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अपेक्षेपेक्षा कमी नोंदणी झाल्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाने यात्रेला तीन दिवस उरले असताना सोमवारपासून ऑन-द-स्पॉट (ऑफलाईन) नोंदणी सुरू केली. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नव्हती, त्यांच्यासाठी प्रशासनाने जम्मूमधील विशेष केंद्रांवर प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे.
भाविकांची मोठी गर्दी
नोंदणी केंद्रावर सोमवार सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. देशाच्या विविध राज्यांतून आलेले शिवभक्त रांगेत उभे राहून यात्रेचा परवाना मिळविण्यासाठी प्रतीक्षा करत होते. परिसरात 'हर हर महादेव' च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
पंजाब ते अमरनाथ कडेकोट सुरक्षा
पंजाबपासून जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेपर्यंतच्या संपूर्ण यात्रा मार्गावर सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग, ट्रान्झिट कॅम्प तसेच पहलगाम आणि बालटाल या दोन्ही यात्रा मार्गावर सुरक्षा वाढवली आहे. जम्मूमध्ये ६०० हून अधिक हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर कार्यान्वित केले असून, 'थर्ड आय' सर्व्हेलन्स प्रणालीद्वारे सतत लक्ष ठेवले जात आहे.