

रवी कोपनर
कात्रज: कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षा भिंतीच्या पुनर्बांधणीच्या कामावरून महापालिकेचा भूसंपादन आणि उद्यान विभागांतील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर आला आहे. भूसंपादन प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संशयामुळे सुरक्षा भिंतीचे काम रखडले आहे. परिणामी, संग्रहालयातील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याने नागरिक आणि प्राणिप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील ६० मीटर डीपी रस्त्यासाठी कात्रज चौकातील संजय गुगळे व इतरांची सुमारे ३९ गुंठे जागा संपादित करण्यात आली. या जागेच्या मोबदल्यापोटी तब्बल २१ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्यक्ष जागेची मोजणी व सीमांकन न करता केवळ कागदोपत्री ताबा घेण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या आक्षेपानंतर भूसंपादन विभागाने पुन्हा केलेल्या मोजणीत प्राणिसंग्रहालयाच्या सध्याच्या सुरक्षा भिंतीच्या आत संपादित झालेली सुमारे १५ गुंठे जागा असल्याचे नमूद केल्याने नवा वाद निर्माण झाला. गेली चार दशकांपासून अस्तित्वात असलेली सुरक्षा भिंत आणि उद्यान विभागाच्या वहिवाटी जागेवर आता मालकी हक्काचा प्रश्न उपस्थित झाल्याने प्रशासन अडचणीत आले आहे.
उड्डाणपूल उभारणीसाठी तोडण्यात येणारी सुरक्षा भिंत पूर्वीच्या जागेवर बांधून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्वीकारली होती. त्यानुसार भिंतीचे काम सुरूही झाले करण्यात आले. मात्र, भूसंपादित जागेच्या सीमारेषांबाबत निर्माण झालेल्या वादामुळे हे काम थांबले आहे. सुरक्षा भिंत मूळ जागेवर उभारायची की भूसंपादन विभागाने दर्शविलेल्या १५ गुंठे जागा सोडून बांधायची, याबाबत प्रशासनात आता संभ्रम निर्माण झाला आहे. या गोंधळात सुरक्षा भिंतीचे काम ठप्प झाले आहे.
याबाबत शिवसेनेचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आक्षेप नोंदवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिकेकडे तक्रार केली असून, संपूर्ण भूसंपादन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भूसंपादन संशयाच्या भोवऱ्यात!
कात्रज चौकातील ३९ गुंठे जागेचे भूसंपादन सुरुवातीपासून वादग्रस्त ठरले आहे. रस्त्यासाठी प्रत्यक्षात १० ते १२ गुंठे जागेची आवश्यकता असताना तब्बल ३९ गुंठे जागा का संपादित करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या भूसंपादन विभागाने अनेक वर्षे उद्यान विभागाच्या ताब्यात असलेल्या सुरक्षा भिंतीच्या आतील सुमारे १५ गुंठे जागा खासगी मालकीची असल्याचे मान्य केल्याने या विभागांत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. एकीकडे उद्यान विभाग ही जागा प्राणिसंग्रहालयाची असल्याचा दावा करीत आहे, तर दुसरीकडे भूसंपादन विभागाने याच जागेचा मोबदला दिल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
प्रशासनाला उत्तर द्यावेच लागेल!
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षेचा प्रश्न प्रलंबित ठेवून भूसंपादन विभाग आणि उद्यान विभागातील विसंगती झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. नेमकी जागा कोणाची? भूसंपादनात कोणती मोजणी झाली? २१ कोटींच्या व्यवहारामागील तथ्य काय? सुरक्षा भिंतीचे काम का रखडले? याबाबत सखोल चौकशी करून महापालिकेने जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाची सुमारे १२९ एकर जागा उद्यान विभागाच्या ताब्यात असून, ती वर्षानुवर्षे वहिवाटीची आहे. विकास आराखड्यातही सुरक्षा भिंतीची नोंद आहे. त्यामुळे सुरक्षा भिंत पूर्वीच्या जागेवरच बांधून देण्यात यावी.
अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका
कात्रज चौकातील भूसंपादन प्रत्यक्ष जागेचा ताबा न घेता कागदोपत्री करण्यात आले आहे. भूसंपादन केलेली ३९ गुंठे जागा सोडून प्राणिसंग्रहालयाची सुरक्षा भिंत बांधावी. सुरक्षा भिंत मूळ जागेवर बांधायची असेल, तर संग्रहालयाच्या आत दाखवलेल्या सुमारे १५ गुंठे जागेचा दिलेला मोबदला परत घेण्याची कारवाई प्रशासनाने करावी.
वसंत मोरे, शहराध्यक्ष, शिवसेना (ठाकरे गट)