

दिलीप शिंदे
ठाणे: पाऊस लांबला असतानाही ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक असलेली दरवर्षीची कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. सत्ताधाऱ्यांनी देखील गांभीर्याने घेतले नसल्याने स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा सुरूच आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील सुमारे ८८ दरडप्रवण क्षेत्रामधील सुमारे दोन लाख ७५ हजार ९६० नागरिक हे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भीतीने धास्तावलेले आहेत.
दरवर्षी होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनाने या दरडग्रस्त भागातील स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या लोकांच्या राहण्यासाठी ७३ हजार ८४० क्षमतेची तात्पुरती व्यवस्था केली आहे. दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर मनपानी देखील टीडीआरएफप्रमाणे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन दल तयार केले जात आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि मुंब्रा येथे गतवर्षी दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाटात सुरू असलेल्या सुरक्षा कामे सुरु आहेत. या दोन्ही ठिकाणी ७० टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकरात लवकर पूर्ण केली जात आहेत. दरवर्षी जिल्ह्यात दरड कोसळून अनेक अपघात होतात, शेकडो लोकांना स्थलांतरीत केले जाते.
वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रशा सनाकडून धोकादायक आणि दरड ग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून त्यानुसार सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. ठाणे जिल्ह्यात ८८ भागात दरड कोसळल्याची शक्यता असून दरड कोसळून सुमारे २ लाख ७५ हजार ९७० लोक बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात १४ दरडींचे अतिधोकादायक विभाग आहेत. त्यातील कळव्यातील सुमारे ६२ हजार, मुंब्रा सुमारे ७५ हजार, भिवंडी सुमारे ३० हजार, नेतिवली टेकडी १७ हजार, कचोरे १७ हजार यासह वागळे, वर्तकनगर येथील संभाव्य बाधितांची संख्या अधिक आहे. संभाव्य दरड कोसळल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विस्थापित होणाऱ्या लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी ७३ हजार ८४० क्षमता असलेले केंद्र सज्ज ठेवलेली आहेत.
त्यामध्ये शाळा, सभागृह, समाज मंदिरांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील दरडींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक दरड प्रणव भागाकडे विशेष लक्ष देत लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जाईल, असे नियोजन प्रशा-सनाकडून करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी साथीचे रोग पसरू नयेत, याची काळजी घेताना शहरी तसेच ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषध साठा, सर्पदंशाची पुरेशी औषधे ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी.
ग्रामीण भागात नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना वेळेवर सुरक्षि-तस्थळी हलविण्यासाठी लाईफ जॅकेट, बोट यांची सज्जता ठेवा. छोट्या मनपाना तातडीने काही कामे करायची असल्यास त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश ही पालकमंत्री शिंदे यांनी दिलेले आहेत. त्याची पूर्तता करण्याचे काम सुरु असल्याचे प्रशास-नाकडून सांगण्यात आले.
प्रत्येक मनपात टीडीआरएफप्रमाणे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन दल ?
ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर इतर मनपानी देखील टीडीआरएफप्रमाणे स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक मनपा हद्दीतील लोकांना त्वरित मदत करण्यासाठी २४ तास कंट्रोल रूम सुरू कराव्यात असेही सांगितले.
तर मंत्रालयाच्या धरतीवर ठाणे जिल्ह्यातील हायटेक यंत्रणा असलेले जिल्हा आपत्कालीन कक्ष विकसित करण्यात आली असून त्यामध्ये जीपीएससह २४ तास सुरु राहणारी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक महापालिका, नगरपालिकांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून एनडीआरएफची तुकडीही तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.