Pahalgam attack
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने विविध पातळ्यावर पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान आज (दि.४ मे) हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यापूर्वी नौदल प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींची लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेही या बैठकी सहभागी झाले होते.
दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (दि.४ मे) हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) उच्चस्तरीय बैठकही झाली. यानंतर सरकारने सैन्याला कारवाई करण्याची मोकळीक दिली.
गुप्तचर संस्थांच्या अहवालात आधीच म्हटले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी १९ एप्रिलच्या सुमारास हल्ला करण्याची योजना आखत होते. यानुसार श्रीनगरभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती परंतु दहशतवाद्यांनी पहलगाममधील निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सरावही सुरू केला आहे. नौदल ३ मेपासून लाईव्ह फाइल ड्रिल्सचे आयोजन केले आहे. त्याच वेळी गुजरात किनाऱ्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर, पाकिस्तानी सैन्य देखील त्यांच्या शस्त्रांच्या चाचण्या करत आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सलग दहाव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या नवीन उपाययोजनांमध्ये भारताने आयात, येणाऱ्या मेल आणि पार्सलवर नवीन निर्बंध लादले आहेत. सर्व भारतीय बंदरांवर पाकिस्तानमधून येणाऱ्या जहाजांनाही बंदी घातली आहे. यापूर्वी १९६० मध्ये भारताने सिंधू पाणी करार रद्द केला होता. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यांना २९ एप्रिलपर्यंत त्यांच्या देशात परतण्यास सांगितले होते. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने शिमला करार रद्द करण्याची आणि भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे. भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्रही बंद केले आहे.