

India-Pak tensions flare
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भारतीय पर्यटकांवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. विविध पातळीवर निर्बंध लादून पाकिस्तानचे कंबरेड मोडले आहे. आता पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तान कोणत्याही क्षणी हल्ला करु शकतो, अशी शक्यता पाकिस्तानमध्येच व्यक्त केली जावू लागली आहे. भारत हल्ला करणार याचा मोठा धसका पाकिस्तानमधील खासदार शेर अफजल खान मारवत यांनी घेतला आहे. भारताने हल्ला केल्यास काय करणार या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे. त्याचे उत्तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून आयातीवर बंदी घातली आहे. पाकिस्तानी ध्वज फडकवणाऱ्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश बंदीही करण्यात आली आहे. दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आणखी कठोर पावले उचलण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांमधील युद्धाच्या शक्यताही व्यक्त होत आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर तुम्ही काय करणार, असा प्रश्न माध्यमांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य असलेल्या मारवत यांना विचारला. तसेच दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे संयम बाळगावा? असा सवालही त्यांना केला. यावर ते म्हणाले की, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या मावशीचा मुलगा आहेत का, मी सांगितल्याने ते मागे हटतील, असे तुम्हाला कसे वाटते. जर युद्ध झाले तर मी इंग्लंडला जाईन." त्याचे हे उत्तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शेर अफजल खान मारवत हे पाकिस्तानमधील ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षामध्ये होते. त्यांनी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर अनेक वेळा टीका केली. यानंतर त्यांना पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकले होते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सलग दहाव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या नवीन उपाययोजनांमध्ये भारताने आयात, येणाऱ्या मेल आणि पार्सलवर नवीन निर्बंध लादले आहेत. सर्व भारतीय बंदरांवर पाकिस्तानमधून येणाऱ्या जहाजांनाही बंदी घातली आहे. यापूर्वी १९६० मध्ये भारताने सिंधू पाणी करार रद्द केला होता. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यांना २९ एप्रिलपर्यंत त्यांच्या देशात परतण्यास सांगितले होते. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने शिमला करार रद्द करण्याची आणि भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे. भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्रही बंद केले आहे.