Iran-Israel War | अमेरिकेने आज (दि.२२) इराणच्या तीन अणुकेद्रांवर हल्ला केला आहे. याच कारणामुळे पाकिस्तानने शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची शिफारस केली होती का? पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत जेवण केले होते का? आज ते सर्व उघड झाले आहे, अशा शब्दांमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.
वृत्तसंस्था 'ANI'शी बोलताना ओवेसी म्हणाले की, "पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत जेवण केले होते का? याच कारणामुळे पाकिस्तानने शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची शिफारस केली होती का? आज ते सर्व उघड झाले आहे."
वृत्तसंस्था 'ANI'शी बोलताना ओवेसी म्हणाले की, अमेरिकेचे धोरण फक्त इस्रायली सरकारचे गुन्हे लपवण्याचे आहे. गाझामध्ये नरसंहार सुरु आहे. याबाबत कोणीही बोलत नाही. इस्रायलकडे किती अणुबॉम्ब आहेत हे कोणी का विचारत नाही?. अमेरिकेने इराणमधील तीन-चार ठिकाणी बॉम्बस्फोट केल्याने त्यांना रोखता येणार नाही. पुढील ५ ते १० वर्षांत इराण देखील ते करेल, इतर देश देखील ते करतील कारण आता त्यांना हे समजले आहे की अणुबॉम्ब आणि अणुबॉम्ब असणे हाच इस्रायलच्या वर्चस्वाविरुद्धचा एकमेव प्रतिबंध आहे."
".अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन केले आहे. मला आशा आहे की, केंद्र सरकार आज झालेल्या इराणी अणुऊर्जा प्रकल्पांवर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करेल, असे नमूद करत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पॅलेस्टिनी लोकांची कत्तल केली आहे. इतिहास नेतन्याहूंना पॅलेस्टिनी लोकांचा कसाई म्हणून लक्षात ठेवेल," अशी टीकाही त्यांनी केली.
पाकिस्तान २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान ट्रम्प यांच्या राजनैतिक हस्तक्षेप आणि मध्यस्थीमुळे मोठे युद्ध टाळण्यास मदत झाली, असे पाकिस्तानने म्हटले होते. ट्रम्प यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केल्यानंतर तीन दिवसांनी ही अधिकृत घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, पाकिस्तानकडून ट्रम्प यांना नोबेलसाठी नामांकन देण्याच्या आश्वासनावर मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करण्यात आले होते, असेही मानले जात आहे. ट्रम्प सतत दावा करत आहेत की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला. तथापि, भारताने त्यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. भारतीय सैन्याच्या भयंकर प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानला संघर्ष थांबवण्याची विनंती करावी लागली हे देखील स्पष्ट झाले आहे.
अणुबाम्बची निर्मिती अंतिम टप्प्यात आल्याच्या संशयावरुन इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला होता, परंतु इराणच्या अणुप्रकल्प भूमिगत आहेत, ज्यामुळे इस्रायली हल्ल्यांमध्ये त्यांचे फारसे नुकसान झाले नाही. आज अमेरिकेने सर्वात खास शस्त्रांपैकी एक, बी-२ स्टील्थ बॉम्बरमधून ३०,००० पौंड वजनाचे मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर किंवा बंकर बस्टर बॉम्ब वापरत इराणमधील अणुक्रेंद्रांवर हल्ला केला. अमेरिकेने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख इराणी अणुप्रकल्पांना लक्ष्य केले.