

Sonia Gandhi on India Iran ties : इराण भारताचा जुना मित्र आहे आणि अशा परिस्थितीत भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. भारताने गाझामधील विध्वंस आणि इराणमधील हल्ल्यांबद्दल स्पष्ट, जबाबदार आणि जोरदार आवाजात बोलले पाहिजे. अजून उशीर झालेला नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रायलने इराणवर केल्या हल्ल्याचा निषेध केला.
'द हिंदू'मध्ये लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे की, "इस्रायल हा देश स्वत: एक अण्वस्त्रधारी आहे, परंतु अण्वस्त्रे नसतानाही इराणला लक्ष्य केले जात आहे. हा इस्रायलचा दुटप्पीपणा आहे. १३ जून २०२५ रोजी इस्रायलने इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आणि एकतर्फी हल्ला केला, जो बेकायदेशीर आणि प्रादेशिक शांततेसाठी धोकादायक आहे. काँग्रेस इराणमधील या हल्ल्यांचा निषेध करते. गाझावरील हल्ल्याप्रमाणेच इस्रायलची ही कारवाई देखील क्रूर आणि एकतर्फी आहे. हा हल्ल्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर गंभीर अस्थिरता आणि संघर्ष होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे."
इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असताना आणि त्याचे चांगले संकेत मिळत होते. या वर्षी पाच फेऱ्या चर्चेच्या झाल्या आहेत आणि सहाव्या फेरीच्या चर्चेचे आयोजन जूनमध्ये होणार होते. मार्चमध्येच अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी संसदेत सांगितले होते की, इराण अण्वस्त्रे बनवण्यावर काम करत नाही. तरीही इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली, इस्रायलने सतत शांतता बिघडवण्याचे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. हे खूप दुर्दैवी आहे, अशी खंतही सोनिया गांधी यांनी आपल्या लेखातून व्यक्त केली आहे.
१९९५ मध्ये इस्रायली पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या द्वेषाला नेतन्याहू यांनीच खतपाणी घातले. पॅलेस्टिनी आणि इस्रायली यांच्यातील शांततेची आशा नष्ट केली. नेतन्याहू यांचा इतिहास दर्शवितो की त्यांना वाटाघाटी नको आहेत, उलट त्यांना संघर्ष हवा आहे. इराण भारताचा जुना मित्र आहे आणि अशा परिस्थितीत भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. भारताने गाझामधील विध्वंस आणि इराणमधील हल्ल्यांबद्दल स्पष्ट, जबाबदार आणि जोरदार आवाजात बोलले पाहिजे. अजून उशीर झालेला नाही, असा सल्लाही सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.