Abhijeet Dipke Delhi Press Conference: निवडणूक आयोगाच्या कारभारावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना आता कॉकरोच जनता पार्टी (CJP) पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होत आहे. त्यामुळे CJPकडून नव्या आंदोलनाची किंवा मोठ्या घोषणेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अभिजीत दीपके यांच्यासोबत CJPचे प्रमुख नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनीही दिल्लीतील आपापले नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीकडे रवाना होत असल्याची माहिती दिली आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये, “चुनाव आयोग ठीक करो. कल दिल्ली में जरूरी प्रेस कॉन्फ्रेंस है. ज्ञानेश, इट्स डन ब्रो,” असा उल्लेख केला होता. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी दिल्लीची फ्लाइट पकडण्यासाठी जात असल्याचे सांगितले.
आशुतोष रांका यांनीही निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेशी संबंधित अलीकडील घटनांचा दाखला देत आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले. अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आपण तातडीने दिल्लीला रवाना होत असून, गुरुवारी महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला ही पत्रकार परिषद दुपारी १२ वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर तिची वेळ बदलून दुपारी २ वाजता करण्यात आली. या पत्रकार परिषदेत दीपके, रांका आणि दास निवडणूक आयोगासंदर्भातील आपली भूमिका मांडणार आहेत.
CJPच्या अधिकृत हँडलवरूनही पत्रकार परिषदेची माहिती देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित अलीकडील घडामोडींचा संदर्भ देत CJP नेतृत्वाने आपले नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, ‘भारताच्या लोकशाहीचे अपहरण’ या विषयावर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमकी कोणती भूमिका जाहीर केली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगावर विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात SIR प्रक्रियेवरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विविध विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप नोंदवले आहेत.
काही विरोधी पक्षांकडून SIR प्रक्रियेबाबत आक्षेप घेतले जात असून, मतदार याद्यांच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर CJPनेही निवडणूक आयोगाविरोधात आपली भूमिका अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर CJPने यापूर्वी दिल्लीमध्ये आंदोलन केले होते. आता निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर CJPकडून पुन्हा आंदोलनाची घोषणा होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिजीत दीपके यांच्या पोस्टमधील “ज्ञानेश कुमार, इट्स डन” या वक्तव्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत चर्चेला आणखी उधाण आले आहे. मात्र, गुरुवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत CJP नेमकी कोणती घोषणा करते, हे स्पष्ट झाल्यानंतरच पुढील चित्र समोर येईल.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून SIRसह सर्व निर्णय सर्वानुमते घेतले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, SIRसह आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीने घेतले जात आहेत.
मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी यापूर्वीही करण्यात आली असल्याचे आयोगाने म्हटले आहे. यावेळी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ही प्रक्रिया अधिक व्यापक आणि सुलभ झाल्याचा दावाही आयोगाकडून करण्यात आला आहे.
आयोगाने वैचारिक मतभेद आणि संस्थात्मक संघर्ष यामध्ये फरक असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे विरोधकांकडून आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असताना, दुसरीकडे आयोगाने आपले निर्णय सर्व अधिकाऱ्यांच्या संमतीने घेतले जात असल्याचे सांगितले आहे.
आता गुरुवारी होणाऱ्या CJPच्या पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके कोणती भूमिका जाहीर करतात आणि निवडणूक आयोगाविरोधात पुढील आंदोलनाची घोषणा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.