राष्ट्रीय

Fact Check | 500 रुपयांच्या नोटा मार्च २०२६ पर्यंत बंद होणार? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

सोशल मीडियावर मेसेज व्हायरल, PIBने फॅक्ट चेक करत याप्रकरणी दिले स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

५०० रुपयांची नोट बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकार मार्च २०२६ पासून ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

Fact Check : 500 Rupee Note Ban

नवी दिल्‍ली : ८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस देशभरातील नागरिकांच्या आजही स्मरणात आहे. यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ८ वाजता ‘नोटबंदी’ (Demonetization) जाहीर केली होती. सरकारने चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा त्याच मध्यरात्रीपासून (१२ वाजेपासून) कायदेशीर व्यवहारासाठी बाद ठरवल्या. तर जुन्या नोटांच्या बदल्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन डिझाइनच्या नोटा चलनात आणल्या जातील, असे जाहीर केले होते.

५०० रुपयांची नोट बंद होणार असल्याचा मेसेज

आता नवीन वर्षात मार्च २०२६ पासून ५०० रुपयांची नोट बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सरकार मार्च २०२६ पासून ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (PIB) फॅक्ट चेक करत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

PIB कडून ‘फॅक्ट चेक’ जारी

PIB ने आपल्या फॅक्ट चेक रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटांचे चलन बंद करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. ५०० रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत. त्या कोणत्याही व्यवहारासाठी वापरल्या जाऊ शकतात. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.

सोशल मीडियावर नक्की काय अफवा पसरली?

काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, आरबीआय लवकरच ५०० रुपयांच्या नोटा परत घेणार आहे. यावर पीआयबीने म्हटले आहे की, “हा दावा खोटा आहे! आरबीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.” तसेच, कोणतीही बातमी फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासून पाहावी, अशी विनंतीही नागरिकांना करण्यात आली आहे.

याआधीही पसरल्या होत्या अफवा

५०० रुपयांच्या नोटांबाबत अशा प्रकारच्या अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून नोटबंदीच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्येक वेळी पीआयबी आणि सरकारने अशा बातम्यांचे खंडन करून वस्तुस्थिती समोर आणली आहे.

वित्त राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली होती माहिती

केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनीदेखील संसदेत माहिती देताना स्पष्ट केले होते की, ५०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा एटीएममधून पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहतील. ५०० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT