मनमाड,www.pudhari.news 
Latest

Nashik : मनमाड रेल्वे स्थानकात आढळली संशयास्पद बॅग, पुढे जे झालं…

गणेश सोनवणे

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

मनमाड रेल्वे स्थानकात घातपात घडविण्याच्या उद्देशाने संशयास्पद वस्तू ठेवण्यात आल्याचा मेसेज कंट्रोल रूमच्या वायरलेसवरून मिळताच रेल्वे स्टेशनमास्तर, आरपीएफ, रेल्वे पोलिस आणि इतरांमध्ये खळबळ उडाली. एटीएस, सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, रेल्वेचे अधिकारी, कमांडो यांनी अविलंब श्वानपथक, मेटल डिटेक्टर, मशीनगन व इतर शस्त्रे घेऊन रेल्वे स्थानकातील सर्व 6 प्लॅटफाॅर्म, तिकीट बुकिंग कार्यालय, पार्सल परिसर आणि प्रवाशांसाठी असलेल्या विश्रामगृहाची कसून तपासणी केली. त्यांना एका ठिकाणी संशयास्पद बॅग आढळली. त्यातून टिकटिक असा आवाज येत होता. त्याची तपासणी गोल्डी या श्वानपथकाद्वारे केली असता त्यात बॉम्ब असल्याचे संकेत गोल्डीने देताच सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आणि त्यांनी सर्वप्रथम परिसर रिकामा करून त्याची घेराबंदी करण्यात आली. त्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी बॉम्ब निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ही बॅग दोन संशयितांनी ठेवल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले. त्यानुसार तातडीने त्यांचा शोध घेतल्यानंतर ते दोघे एका ठिकाणी असल्याचे दिसून आले. त्यांनादेखील सापळा रचून जेरबंद करण्यात आले. हा सर्व थरार पाहून प्रवाशांसह नागरिकांच्या काळजा ठोका चुकला होता. मात्र बॅगेमध्ये कोणताही बॉम्ब नाही आणि पकडलेले दोघे अतिरेकी नसून हे सुरक्षा तपासण्यासाठी घेण्यात आलेले मॉकड्रिल असल्याचे सांगिल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

निर्मितीपासून पाकिस्तान भारतात अतिरेकी पाठवून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. आजही जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून, प्रजासत्ताक दिन असो अथवा स्वातंत्र्य दिन असो किंवा सणासुदीचे दिवस अशावेळी गंभीर घातपात घडविण्याचा प्रयत्न अतिरेकी करीत असतात. त्यांच्या हिटलिस्टवर देशातील महत्त्वाची रेल्वेस्थानके असतात. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मनमाड रेल्वेस्थानक महत्त्वपूर्ण जंक्शन आहे. येथून रोज सुमारे125 हून अधिक प्रवासी गाड्यांची ये-जा होत असते. त्यामुळे रेल्वेस्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अशावेळी कोणी रेल्वेस्थानकात घातपात घडविण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळी सुरक्षा यंत्रणा किती अलर्ट आहे, याची तपासणी करण्यासाठी अचानक हे मॉकड्रिल घेण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. रेल्वे पोलिस प्रभारी निरीक्षक एस. एस. वाघमोडे, रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक एस. एस. डेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मॉकड्रिलमध्ये रेल्वे पोलिस, आरपीएफ, शहर पोलिस, पालिकेचे अग्निशमन दल, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, नर्स, रेल्वेचे इतर अधिकारी यांच्यासह दारा आणि गोल्डी या श्वान पथकांसह गणेश भोसले, देवेंद्र कुंभार, दीपक पिंपळसे, नारायण शिरसाठ, जयदेव मगर, प्रतीक करोशिया, रामा निस्ताने, दीपक झाल्टे, मनोज पवार आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT