सांगली : खटाव संक्रांतोत्सवात १०० पोती साखर वाटप | पुढारी

सांगली : खटाव संक्रांतोत्सवात १०० पोती साखर वाटप

लिंगनूर; पुढारी वृत्तसेवा : खटाव (ता. मिरज) येथे मकर संक्रांत सण १०० पोत्यांपेक्षा जास्त साखर वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामदैवत सोमेश्वर व अमोघ सिद्ध देवाचा पालखी सोहळा फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल वाद्यांत उत्साहात साजरा झाला. मळ्यातील सोमेश्वर मंदिरापासून ते गावातील सोमेश्वर मंदिरापर्यंत प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मकर संक्रांतीच्या दिवशी खटाव गावचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर व अमोघ सिद्ध देवाची पालखी तसेच जानराववाडीचे ग्रामदैवत श्री मंगोबा देवाची पालखी खटावहून ऐनापूरच्या श्री सिध्देश्वर देवाच्या भेटीसाठी गेली. जाताना केंपवाड येथील श्री मल्लीकारसिद्ध देवाची भेट घेऊन चारही देवांची पालखी ऐनापूरकडे गेली.

किंक्रांतच्या दिवशी पालखी दिवसभर श्री सोमेश्वर मंदिरात थांबते. संध्याकाळी ७.३० वाजता अंबिल व भाताचा नैवेद्य दाखवून व साखर देवाला वाटून संक्रांतीच्या शुभेच्छा कन्नड व मराठी भाषेत दिल्या गेल्या.

नैवेद्याचा कार्यक्रम झाल्यावर मळ्यातील श्री सोमेश्वर मंदिरातील दोन्ही देवांची पालखी गावातील प्रमुख मार्गावरून वाजत – गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढत गावातील श्री सोमेश्वर देवालयाच्या पटांगणात आणली जाते. या ठिकाणी श्री सोमेश्वर व अमोघ सिद्ध देवाच्या पालखीत साखर नैवेद्य दाखवून एकमेकांना साखर देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या.

गावातील काही भक्त पन्नास किलोची पोती भरून साखर वाटप करतात. गावातील प्रत्येक ग्रामस्थ कमीत कमी ५ किलोपासून १०० किलोपर्यंत साखर वाटप करतात. त्यामुळे पूर्ण गावामध्ये पन्नास किलोच्या सुमारे 100 पोत्यांपेक्षा जास्त साखर वाटप केली गेली आहे.

Back to top button