नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, चाैधरी यांनी बुधवारी (दि. २१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित होते त्या पार्श्वभूमीवर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात संजय राऊत यांनी आधीच ट्विट करुन माहिती दिली होती.
चौधरी यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची गेल्या पाच वर्षांपासून जबाबदारी होती. पक्ष संघटन बळकट करण्याची त्यांच्याकडे प्रामुख्याने जबाबदारी होती. मात्र, त्यांनीच शिंदे गट गाठल्याने नाशिकमध्ये ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. खासदार संजय राऊत यांचे चाैधरी हे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात त्यांच्याकडे पक्षाच्या मोर्चेबांधणीचे काम सोपविण्यात आले होते. त्यादृष्टीने ते दर आठवड्याला नाशिकमध्ये येऊन पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकांशी संपर्क साधून होते. डोंबिवली येथे वास्तव्यास असले तरी त्यांची चांदवड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी हाेती. खासदार राऊत यांचे निकटवर्तीय, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याही संपर्कात ते होते. शिवसेनेच्या कोअर कमिटीत चौधरी यांचा समावेश होता. चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले होते, म्हणून शिवसेनेतून (ठाकरे गट) त्यांची हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेच्या बळकटीकरता विधानसभा अध्यक्ष, गटप्रमुख तसेच शाखाप्रमुखांच्या बैठका घेण्याचे नियोजन करत असताना त्यांना अंतर्गत कलह आणि गटबाजींनाही सामाेरे जावे लागत होते.
मागील आठवड्यात ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या १२ नगरसेवकांसह मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशसोहळ्यामागे भाऊसाहेब चाैधरी यांचाच हात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे येत्या काळात चौधरी आणखी काही माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना गळाला लावू शकतात. त्यामुळे आहे त्या पदाधिकाऱ्यांना सांभाळण्याची कसरत ठाकरे गटाला करावी लागणार आहे.
पक्ष बळकटीचे काम जिल्हा संपर्कप्रमुख या नात्याने भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे होते. मात्र, त्यांनीदेखील पक्षाचा विश्वासघात केला. 'त्या' माजी नगरसेवकांना फोडण्यात त्यांचाच हात असल्याचे आता समोर आले आहे.
– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)