पुणे : रस्त्यावरील बालकांना ’फिरत्या पथका’चा हात | पुढारी

पुणे : रस्त्यावरील बालकांना ’फिरत्या पथका’चा हात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर राहणार्‍या बालकांसाठी‘फिरते पथक’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत संबंधित जिल्ह्यांमध्ये एक बस फिरणार असून, प्रत्येक बालकाला त्याच्या वयोगटाप्रमाणे आहार आणि शैक्षणिक मदत मिळवून दिली जाणार आहे. महिला आणि बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. रस्त्यावर राहणार्‍या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक हा नावीन्यपूर्ण एकात्मिक प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे तसेच प्रकल्पासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सहा महिन्यांसाठी हा प्रकल्प राबवण्यात येईल. जिल्ह्यातील, शहरात रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत बस फिरविण्यात येईल. प्रकल्पाच्या अंमबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांमध्ये 25 मुलांच्या क्षमतेची बालस्नेह बस उपलब्ध करून त्यावर महिला आणि बालविकास विभागांतर्गत फिरते पथक असे लिहिलेले असावे. त्या बसला सीसीटीव्ही कॅमेरा आणि ट्रॅकिंग प्रणाली असणे आवश्यक आहे.

रस्त्यावर राहणार्‍या मुलांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने हा प्रकल्प राबवण्यात येईल. मुलांना शैक्षणिक साहित्य, गाणी, चित्रकला, नृत्य, गोष्टी याद्वारे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करून जवळच्या शासकीय शाळेत, सहा वर्षांखालील मुलांना अंगणवाडीमध्ये दाखल करण्याचे प्रयत्न करावेत. मुलांना रुचकर आणि पोषक अन्न देण्यात यावे. मुलांची वैद्यकीय तपासणी
करून आवश्यक ते उपचार करावेत. संबंधित मुलांचे आधार कार्ड काढावे, असे नमूद करण्यात आले आहे.

Back to top button